तेच शहर अन् तेच ठिकाण! अविनाश जाधव आज 'हर हर महादेव' चित्रपट मोफत दाखवणार; राजकारण तापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:26 AM2022-11-08T08:26:39+5:302022-11-08T08:33:01+5:30
'हर हर महादेव' या मराठी चित्रपटावरुन ठाण्यात सध्या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे.
- मुकेश चव्हाण
'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ सोमवारी रात्री १० च्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शहरातील विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले. तसेच कोण जितेंद्र आव्हाड? असा सवाल केल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. दरम्यान, आव्हाड यांची पाठ फिरताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी ५ मिनिटांत विवियाना मॉल गाठत हर हर महादेव हा चित्रपट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.
अविनाश जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 'हर हर महादेव' हा चित्रपट विवियाना मॉलमध्ये पुन्हा सुरु करण्यात आला. अविनाश जाधव यांनी यावेळी स्वत: चित्रपटगृहात बसून संपूर्ण चित्रपट पाहिला. तसेच मी चित्रपट पाहतोय. माझ्यासह अनेक प्रेक्षक देखील उपस्थित आहे. त्यामुळे चित्रपट बंद करुन दाखवाच, असा इशाराही अविनाश जाधव यांनी यावेळी दिला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री घडला. त्यानंतर आज अविनाश जाधव यांनी मोठी घोषणा केली आहे.
सोमवारी रात्री सदर प्रकार घडला त्या ठाण्यातील विवियाना मॉलच्या चित्रपट गृहातच 'हर हर महादेव' या चित्रपटाच्या 'मोफत शो'चे आयोजन केले आहे. आज सायंकाळी ६.१५ वाजता हा चित्रपट प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. एकप्रकारे अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आज पुन्हा ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, एका दर्शकाने तिकिटाचे पैसे परत द्या, आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दांत मॉलचालकाला सुनावले. यानंतर या दर्शकाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, या दर्शकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावर प्रेक्षकांना मारहाण करणे चुकीचे आहे. मारहाण करणायास अटक करावी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली. तसेच चित्रपट प्रर्दशित होऊन १०-१२ दिवस झाले. तेव्हा जितेंद्र आव्हाड कुठे होते? आज जाग का आली?, असा सवालही अविनाश जाधव यांनी उपस्थित केला.