मनसेच्या वाट्याला गेल्यानंच ‘त्यांचं’ मुख्यमंत्रिपद गेलं, राज ठाकरेंचा उद्धव यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 05:38 AM2023-03-10T05:38:52+5:302023-03-10T05:39:39+5:30
भरतीनंतर ओहोटी येते हे भाजपनेही विसरू नये, राज ठाकरेंचा सूचक इशारा
ठाणे : मशिदीवरील भोंगे उतरवणे, पाकिस्तानी कलाकारांना हाकलून लावणे यासारखी सारीच आंदोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केली. स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणारे पक्ष त्यावेळी काय फक्त चिंतन करीत होते. हिंदुत्वाला मानता म्हणजे केवळ जपमाळ ओढता का, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केला.
हिंदुत्ववादी पक्षाच्या कृतीत हिंदुत्व दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. मनसेच्या वाट्याला गेल्याने मुख्यमंत्रिपद गेले, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मारला. गेली १७ वर्षे सत्ता नसतानाही साथ न सोडणाऱ्या मनसैनिकांचे आभार मानतानाच आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल. कारण लोक राज्यातील सर्व पक्षांना विटलेले आहेत, असे ते म्हणाले.
मनसेचा १७ वा वर्धापन दिन गुरुवारी गडकरी रंगायतन सभागृहात साजरा झाला. यावेळी कार्यकर्त्यांना राज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाने स्थापनेपासून केलेली आंदोलने, कामे याबाबतच्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच पक्षाच्या वेबसाईटचे लोकार्पण केले. राज म्हणाले की, माझ्या सभेला गर्दी होते; परंतु मते मिळत नाहीत, हा प्रचार आहे. काही पक्षाच्या विचारांना बांधलेले पत्रकार हा अपप्रचार करीत आहेत. यापूर्वी पक्षाचे १३ आमदार निवडून आले ते काय सोरटवर निवडून आले होते का? २०१४ व २०१९ या निवडणुकीत देशावर राज्य केलेल्या काँग्रेसची अवस्था बिकट झालेली आहे.
भरतीनंतर ओहोटी हे नैसर्गिक असून भाजपला आज भरती असली तरी त्यांनीही ओहोटी येणार हे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला. मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या यशस्वी आंदोलनानंतर आपल्याला अयोध्येला बोलावले होते. तेथे आपल्याला विरोध करणारे हिंदुत्ववादीच होते. ते काय राजकारण सुरू होते ते मला माहीत होते, पण मनसेच्या वाट्याला गेलेल्यांना मुख्यमंत्रिपदावरून जावे लागले, असे राज म्हणाले.
त्याला सर्वांत प्रथम कळेल...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करून राज म्हणाले की, ज्याने कुणी हे कृत्य केले त्याला सर्वांत प्रथम कळेल व नंतर त्यानेच हे केले असल्याचे इतरांना कळेल. माझ्या मुलांचे रक्त मी फडतूस लोकांकरिता वाया जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील पक्षाची बाजू विधानसभेत मांडत आहेत, असे राज म्हणाले.
मनसेने ६५ टोलनाके बंद केले. नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा डाग न लागता अनेक कामे केली. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवले जाऊ लागले. मराठी पाट्या लागल्या, अशा विविध आंदोलनांचा उल्लेख करून राज यांनी आपल्या पक्षाने केली तेवढी आंदोलन अन्य पक्षांनी केली नाही, असा दावा केला.
अत्यंत खालच्या भाषेचा वापर
सध्या महाराष्ट्रात अत्यंत खालची भाषा वापरून हल्ले केले जात आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले तो महाराष्ट्र इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत आहे. महाराष्ट्राचे काही खरे नाही. सध्या जे सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे आहे, असेही ते म्हणाले. २२ तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्यात विरोधकांचे वाभाडे काढण्याचा बुफे तुम्हाला देणार असल्याचे सांगितले.
- छायाचित्रकार आनंद शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत हत्तीवरील अभ्यासाकरिता आपले आयुष्य दिल्याने मनसेचा पहिला मराठी अभिमान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
- तुषार घाडीगावकर यांनी तयार केलेल्या मनसे गीताकरिता त्यांचा व कलाकारांचा राज यांच्या हस्ते सत्कार केला.
- अमेय खोपकर यांनी तयार केलेले नवे मनसे गीत यावेळी सादर करण्यात आले.
- राज यांच्या मोटारीवर फुले उधळून त्यांचे स्वागत केले.