Vasant More : ... तर आपल्या नगरसेवकांना, आमदारांना अमेरिकेतूनही फोन येतील; वसंत मोरेंनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:05 PM2022-04-12T19:05:37+5:302022-04-12T19:05:57+5:30
गेल्या चार पाच दिवसांत आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रातील असा पक्ष राहीला नाही जो माझ्याकडे आला नाही - वसंत मोरे
"मला कोरोनाचा काळ आठवला की अंगावर काटा येतो. सर्व आज पुण्याचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. पुण्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होता, तेव्हा सरकारच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होतं, ते ना सरकारनं केलं ना पालिकेनं केलं. त्यावेळी मनसेनं काम केलं. सर्व पक्षांचे नेते घरी असताना मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर होते. यादरम्यान आम्ही जी भूमिका पुण्यात घेतली, यात एका अँबेसेडरची काच फुटली त्याचा आवाज महाराष्ट्रानं ऐकला. त्यानंतर एक दिवसात जे पुण्यात काम झालं. ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती, तिकडेही मनसैनिक जात होता. सरकार जेव्हा मागे पडत होतं तेव्हा आम्ही दवाखाने उघडले," अशी आठवण मनसे नेते वसंत मोरे यांनी काढली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राज ठाकरे यांच्या 'उत्तर सभे'दरम्यान मोरे यांनी आपलं मत व्यक्त केलं.
"कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना बँक, फायनॅन्स कंपन्यांच्या लोकांनी त्रास द्यायला सुरूवात केली. तेव्हा मनसेची दारं उघडी होती. एक गोष्ट लक्षात ठेवा फायनॅन्स वाला दारात आला की मनसेवाला आठवतो, बँकवाला दारात आला की मनसेवाला आठवतो, पैसे अडकले असतील तर मनसेवाला आठवतो. पण निवडणुका लागतात तेव्हा मनसेवाले कुठे जातात. तेव्हा का आमचा विचार होत नाही. आपण पोहोचत नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे," असंही मोरे म्हणाले.
घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर
"राज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला काम करावं लागेल. गेल्या चार पाच दिवसांत आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रातील असा पक्ष राहीला नाही जो माझ्याकडे आला नाही. आपण एक गोष्ट यातून घेतली पाहिजे, जर मनसेचा नगरसेवक इतकं चांगलं काम करतो आणि त्याला सर्व पक्षातून ऑफर येतात. तर राज ठाकरेंकडे राज्याची सत्ता हाती दिली तर अमेरिकेतून आपल्य नगरसेवकांना, आमदारांना फोन येतील, आपल्या लोकांना तिकडे बोलावून घेतील. आपण काम कसं करतो हे तुम्हाला सर्वांना माहितीये, असं त्यांनी नमूद केलं.
वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं
चंद्रकांत पाटलांकडून ऑफर
"राज ठाकरेंची गेल्या तीन महिन्यांपासून तब्येत बिघडलेली आहे. त्यांना त्रास होतोय हे मी पाहिलं. त्यांना एकेक पायरी चढण्यासाठी त्रास होत होता. ब्लू प्रिंट राज ठाकरेंनी आणली, आम्ही दोनच नगरसेवक आहोत. ती ब्लू प्रिंट कशी राबविली हे कात्रजमध्ये येऊन पहा. शंभरावर नगरसेवकांना जे जमले नाही ते आम्ही दोघांनी केले. पालिकेचा पुरस्कारही मनसेच्या नगरसेवकाला मिळाला," असं त्यांनी यावेळी सांगितलं. सोळा वर्षांमध्ये १६ गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. मला पुरस्कार देताना चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे होत्या. पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, मी गेली १५ वर्षे भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होतोय, असा गौप्यस्फोटही मोरे यांनी यावेळी केला.