समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला
By प्रशांत माने | Published: July 6, 2023 08:02 PM2023-07-06T20:02:14+5:302023-07-06T20:02:53+5:30
'तेव्हा आमचे नगरसेवक फोडले, आता तुम्ही अडचणीत आला म्हणून युती करायची का?'
डोंबिवली: मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता उध्दव ठाकरेंना लगावला. आम्ही आतापर्यंत कोणाशीही युती केली नाही, यापुढे करू नये असे माझे वैयक्तीक मत असल्याकडेही पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले.
गुरूवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांची भेट घेतली. यावर मनसे आणि ठाकरे गटात युतीची चर्चा रंगत आहे. याबाबत आमदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी युतीबाबत भाष्य करताना उध्दव ठाकरेंना लक्ष केले. युतीबाबत बोलताना पाटील म्हणाले माझी अजिबात इच्छा नाही. ते अडचणीत असल्यावर आम्ही युती करावी? आमचे राज ठाकरे अडचणीत असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले, आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल ही पाटील यांनी केला.
आजच्या राजकीय परिस्थितीला उध्दव ठाकरे जबाबदार
शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात, या चर्चेवरदेखील पाटील यांनी भाष्य केले. या त्यांच्या पक्षांतर्गत बाबी आहेत, त्याबद्दल आम्हाला माहीती नाही. मात्र या गोष्टीची सुरूवात उध्दव ठाकरे यांच्यापासून झाली. लोकांनी दिलेला कौल मान्य करून, लोकांच्या मताला मान देऊन, हिश्शासाठी भांडत बसले नसते आणि सरकार बनवले असते तर या गोष्टीच उदभवल्या नसत्या. त्यामुळे एकटया फडणवीसांना दोष देऊन फायदा नाही. लोकांनी जो कौल दिला होता त्या विरोधात सगळं घडलं. त्याचे भोग त्यांच्यासोबत जनताही भोगत आहे, असे पाटील म्हणाले.