अंबरनाथमध्ये गटबाजी संपवत मनसे पदाधिकारी एकत्र; राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सगळे पदाधिकारी आले एकत्र
By पंकज पाटील | Published: May 17, 2023 04:32 PM2023-05-17T16:32:25+5:302023-05-17T16:32:41+5:30
अंबरनाथमध्ये मनसेची ताकद पुन्हा वाढावी यासाठी राज ठाकरे यांनी रविवारी अंबरनाथमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता.
अंबरनाथ : राज ठाकरेअंबरनाथ दौऱ्यावर असताना त्यांनी अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची गडबाजी पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ डोंबिवलीत एका बैठकीसाठी बोलावले. त्या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर गटबाजी ठेवल्यास पदावरून काढू अशी सरळ धमकीच दिली होती. राज ठाकरे यांच्या या कानपिचक्यानंतर मनसेचे सर्व पदाधिकारी गटबाजी बाजूला सारत पक्ष कार्यालयात एकत्रित आले आहेत.
अंबरनाथमध्ये मनसेची ताकद पुन्हा वाढावी यासाठी राज ठाकरे यांनी रविवारी अंबरनाथमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संघटना भक्कम करण्याच्या दृष्टीने सर्व गडटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र बैठकीसाठी बोलावले. या बैठकीत गटबाजी करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी चांगलेच झापले. एवढेच नव्हे तर या गटबाजी करणाऱ्यांना खांद्यावर हात ठेवून उभ्या राहण्यास सांगत राज ठाकरे यांनी त्यांचा फोटो काढला आणि तो फोटो सर्वांनी आपल्या कार्यालयात लावावा असे आदेश दिले. तसेच पक्ष कार्यालयात नियमित संध्याकाळी प्रत्येकाने हजेरी लावण्याची सक्ती केली.
राज ठाकरे यांच्या या सक्तीच्या आदेशानंतर पहिल्या दिवशी शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी पक्ष कार्यालयात हजेरी लावत उपजिल्हाप्रमुख शैलेश शिर्के यांच्यासोबत हात मिळवणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शैलेश शिर्के आणि जिल्हा संघटक संदीप लकडे यांची देखील हात मिळवणी करण्यात आली. यापूर्वी संदीप लकडे आणि कुणाल भोईर एका गटात तर शैलेश शिर्के आणि त्यांचे पदाधिकारी एका गटात होते मात्र आता राज ठाकरेंच्या मध्यस्थी नंतर हे सगळे कार्यकर्ते एकत्रित येऊन संघटना वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी स्पष्ट केले आहे.