सागरीकिनारा ऑनलाइन जनसुनावणीस मनसेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:17 AM2020-09-12T01:17:36+5:302020-09-12T01:17:47+5:30
संबंधित ग्रामपंचायतींना देणे गरजेचे असून घाई गडबडीत घेण्यात येणारी जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
बोईसर : सागरी किनारा आराखड्या-बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या ३० सप्टेंबरच्या आॅनलाईन जनसुनावणीस मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यातील जनता आराखड्याबाबत अनभिज्ञ आहे. याची माहिती संबंधित ग्रामपंचायतींना देणे गरजेचे असून घाई गडबडीत घेण्यात येणारी जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मनसे विद्यार्थी सेनेचे पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष धीरज गावड व मनसे पालघर उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. पालघर जिल्हा आदिवासीबहुल असून येथील बहुसंख्य जनता मागास व अज्ञान आहे. त्यांना इंटरनेटबाबतीत काहीही माहिती नाही. ती समोर येऊन आपले म्हणणे मांडू शकते, पण ते मांडू नये म्हणून प्रशासनाने जाणूनबुजून हे षडयंत्र रचले आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असताना हा अट्टहास कशाला, हा स्थानिक भूमिपुत्र व सागरपुत्र यांच्यावर अन्याय असून त्यांची मालकी असलेल्या व वर्षानुवर्ष वापरत असलेल्या जागा उद्योगपतींसाठी देण्याकरिता का? असा प्रश्न उपस्थित करून जनसुनावणी त्वरित रद्द करून जनजीवन सुरळीत झाल्यानंतरच घेण्यात यावी, अन्यथा लोकहितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.