शाळा अन् कॉलेजमधील विलगीकरणास मनसेचा विरोध, हायकोर्टात याचिका दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:38 PM2020-06-19T15:38:23+5:302020-06-19T15:39:46+5:30
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी मनसेचे ठाणे , पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.
ठाणे : ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालय येथे महापालिकेच्या माध्यमातून क्वॉरन्टाइन सेंटर सुरु करण्यात येणार येत आहे. परंतु मनसेचा या प्रक्रियेलाच विरोध असल्याचे मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी स्पष्ट केले. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ज्या दिवशी मंत्नालयात सर्व मंत्री,अधिकारी आणि कर्मचारी येतील त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळा सुरू करा असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी मनसेचे ठाणे , पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते. सध्या महापालिकेने जोशी बेडेकर महाविद्यालय क्वॉरन्टाइन सेंटर म्हणून ताब्यात घेतले आहे. याविरोधात बेडेकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता मनसे देखील महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात मैदानात उतरली आहे. महापालिकेचा हा निर्णय चुकीचा असून शाळा, महाविद्यालये ताब्यात घेण्यापेक्षा मोठ मोठे हॉल ताब्यात घ्यावेत आणि त्याचा वापर यासाठी करावा असेही त्यांनी सांगितले. महापालिकेने हा निर्णय बदलला नाही, तर या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, तसेच महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलनही उभे केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, आमचा क्वॉरन्टाइन सेंटर सुरु करण्यासाठी आमचा विरोध नसल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु पालिकेचा शाळा महाविद्यालये ताब्यात घेण्याचा हा मुखर्पणाचा निर्णय आहे. दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीने शाळा सुरु करण्याचाही घाट घातला जात असून परंतु जेव्हा मंत्रलयात 100 टक्के मंत्री आणि 100 टक्के अधिकारी हजर होतील, तेव्हांच शाळा सुरु करण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कृपया खेळू नका असेही त्यांनी सांगितले. अविनाश जाधव हे एक लींक सर्वाना पाठवून ठाणेकरांचे मत जाणून घेऊन, शाळा, महाविद्यालयाचे नाव प्रत्येक पालकाने द्यावे आणि या प्रक्रियेला विरोध करावा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच ऑनलाईन शिक्षणाचा बाजार तत्काळ बंद करावा असेही ते म्हणाले.