अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 21:36 IST2024-09-26T21:35:25+5:302024-09-26T21:36:13+5:30
ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये, यासाठी मनसेच्या वतीने कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले आहे.

अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
ठाणे : पोलिसांच्या चकमकीत मृत पावलेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह ठाण्यात तसेच कळव्यात दफन करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये, यासाठी मनसेच्या वतीने कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले आहे. त्याचा मृतदेह त्याच्या गावी पुरण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे, अशी माहिती या प्रकरणात अक्षयच्या वडिलांनी दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र, अक्षयच्या आई-वडिलांना त्याचा मृतदेह दफन करण्यासाठीही जागा मिळालेली नाही. मुलाला न्याय मिळवून द्यावा, अशी त्याच्या कुटूंबीयांची भावना आहे. कुटुंबाचीच ही भावना आहे की, अक्षयचा मृतदेह दफन करण्यात यावा. त्यामुळे मृतदेहाचे दहन न होता तो दफन केला जाणार आहे. त्यामुळे आता अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांसह नातेवाईकांनी जागेचा शोध सुरु केला आहे.
मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या भूमीत दफन करण्यास नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्याने त्याचा मृतदेह कळव्यात दफन करू देणार नसल्याचे म्हटले आहे. जर याठिकाणी मृतदेह दफन पुरण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनसेने दिला आहे.