आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:24 PM2024-10-18T13:24:06+5:302024-10-18T13:24:31+5:30
ठाण्यातील विनयभंग झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाची राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर राज यांनी पोलीस अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
ठाणे - अल्पवयीन मुलीवर विनयभंग प्रकरणी ठाण्यात गेल्या ३-४ दिवसांपासून वातावरण तापलं आहे. त्यात आज पीडित कुटुंबाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या प्रकरणाची माहिती घेत राज ठाकरे यांनी आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, या मुलीचा पुन्हा जबाब नोंदवून आरोपीला अटक करा अशी मागणी राज ठाकरेंनी पोलिसांना केली.
याबाबत माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझं पोलिसांसोबत आता बोलणं झालं, बदलापूरसारखं तुम्ही हे प्रकरण अंगावर घेऊ नका. आरोपी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे महत्त्वाचं नसून कधी कुठल्या पक्षाची ही भूमिका नसते. परंतु एखादी व्यक्ती त्याची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू तर बघायलाच नको. तो कुठच्याही पक्षाचा असला तरी अशा कृत्यांना पाठीशी घालू नये. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्ट जामीन देते कसे, त्या पोरीचा पुन्हा जबाब द्या आणि तो जो कुणी असेल त्याला पुन्हा अटक करा असं पोलिसांना मी सांगितलं आहे.
तसेच टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ज्या केसेस अंगावर घेतल्या होत्या, त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत. हे आंदोलन आमच्या घरचं सत्यनारायण नव्हतं, लोकांसाठी केलेले आंदोलन होते. आज सगळेजण खुश असतील. इतकी वर्ष टोलधाड आपल्यावर पडली होती, टोलचे पैसे किती जमा झाले, कुणाकडे गेले याची कल्पना नव्हती. इतकी वर्ष आमचा पक्ष आंदोलन करतोय, त्याला यश आलं आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो असं कौतुक करत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ठाणेकरांनी गुरुवारी मोर्चा काढला होता. हा मोर्चा ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापर्यंत काढण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाहीतर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल असा इशारा मनसेनं दिला.