मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाला बगल, डोंबिवलीत स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी मांडले ठाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 08:54 PM2017-10-09T20:54:56+5:302017-10-09T21:07:32+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांसह परिसरातील फेरिवाले हटवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तांना १५ दिवसांचे अल्टीमेटम दिले होते.
डोंबिवली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांसह परिसरातील फेरिवाले हटवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तांना १५ दिवसांचे अल्टीमेटम दिले होते. पण असे असतांनाही डोंबिवलीत मात्र त्यांच्या आदेशाला बगल देत स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. या पक्षाचे सर्वाधिक नेते शहरात राहतात, याच ठिकाणी महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका देखील मनसेच बजावतो, पण तरीही ही अवस्था का? असा सवाल डोंबिवलीकरांमध्ये चर्चेला आहे.
शहरातील पूर्वेकडील कल्याण दिशेसह मुंबई दिशेवरील स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. असून ५ आॅक्टोबर रोजी चर्चगेट स्थानकात मनसेने संताप मोर्चा काढला होता. त्यानंतर डोंबिवलीतील स्कायवॉक मोकळा झाल्याचे फोटो मनसे कार्यकर्त्यांनी फेसबुक, व्हाट्सअॅपवर टाकून आनंद व्यक्त केला होता. पण अवघ्या ४८ तासांत फेरिवाल्यांनी पुन्हा स्कायवॉकवर ठाण मांडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाला बगल दिल्याची चर्चा झाली. डोंबिवलीकरांनी रविवारी रात्रीचे दृश्य अशी पोस्ट टाकत फेरिवाल्यांनी ठाण मांडलेले फोटो व्हायरल केले.
याची दखल मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील उपाध्यक्ष राजेश कदम आदींनी घेत तात्काळ केडीएमसीचे प्रभाग अधिकारी, महापौर आदींना संपर्क साधणार असल्याचे लोकमतला सांगितले. पण तीच स्थिती सोमवारीही होती. नेहमीप्रमाणे सोमवारचा बाजार भरलेला होता, स्थिती येरे माझ्या मागल्याची होती. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाचा फुसका बार होता का? अशी चर्चा डोंबिवलीकरांमध्ये रंगली होती.