शिरोळे येथील दगड खदाणी विरोधात मनसेचे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन
By नितीन पंडित | Published: April 24, 2023 05:27 PM2023-04-24T17:27:09+5:302023-04-24T17:28:46+5:30
ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या दगड खाणी व क्रेशर मशीन तत्काळ बंद करावे या मागणी करता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत दगडखाण व क्रशर मशीन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून या दगड खदानीत केल्या जाणाऱ्या स्फोटामुळे अनेक घरांना तडे गेले आहेत.त्यातच संपूर्ण परिसरात दगड पावडर उडून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असल्याची माहिती सरपंच लक्ष्मी लाथड व उपसरपंच रविना मानकर यांनी यावेळी दिली.
या खदान मालकांनी स्थानिक ग्रामपंचायती कडून कोणतीही परवानगी न घेताचे खदान व क्रेशर मशीन सुरु केल्याचा आरोप दवखील यावेळी सरपंचांनी केला असून सुरू असलेल्या क्रेशर व खदान तात्काळ बंद करण्यासाठी व पुढील आदेश होई पर्यंत याठिकाणी काम सुरू करू नयेत असा अहवाल तलाठी खंबाळा यांनी दिला असताना ही त्यास खदान मालक जुमानत नसल्याने खदान व क्रेशर मालकांविरोधात शिरोळे ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालय समोर निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार अधिक पाटील यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा केली.
दरम्यान येथील दगड खदान व क्रेशर मशीन या परवानगी घेवून सुरू असुन त्यांच्या कडून अटी शर्थीचे भंग होत असल्यास त्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाकडून करण्यात येईल, त्यासाठी सतत काही दिवस एक पथक येथील क्रेशर परिसरावर लक्ष ठेवून असणार आहे,तर प्रदूषण होत असल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळालाकडे यासंदर्भातील पत्रव्यवहार करून कारवाई करण्यास भाग पाडू असे आश्वासन तहसीलदार अधिक पाटील यांनी शिष्ठमंडळास दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"