टोल दरवाढीच्या विरोधात मनसेचे ठाण्यात चौक आंदोलन
By जितेंद्र कालेकर | Published: October 1, 2023 08:59 PM2023-10-01T20:59:33+5:302023-10-01T21:00:03+5:30
ठाण्यातील विविध भागात मनसे पदाधिकारी करणार टोल विषयी लोकांमध्ये जनजागृती.
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याच्या सीमेवरील मुलुंड टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी टोल दरवाढीच्या विरोधात शनिवारी साखळी आंदोलन करून या टोल वाढीचा निषेध नोंदविला. तर रविवारी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत ठाण्यातील महत्त्वाच्या चौकात फलकांद्वारे जनजागृती आंदोलन केले.
राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्या स्थितीत रस्त्याची देखभाल करीत नसून रस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण केले आहेत. एकूण ५५ पूलांपैकी फक्त १३ पूलांची एमएसआरडीसी प्राधिकरणाच्या वतीने देखभाल केली जाते. त्यामुळे प्राधिकरण जर देखभाल करीत नसेल तर त्यांच्यामार्फत टोल वसुल करणे चुकीचे आहे. या विरोधात मनसेने आंदोलनाची भूमिका घेतली असून रविवारी ठाण्यातील चौका चौकात आंदोलन करीत टोल दरवाढीला तीव्र विरोध करत मनसे पदाधिकारी यांनी घोषणा देत आपला विरोध दर्शवला.
या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ठाणेकर नागरिकांना येत्या ५ ऑक्टोबर रोजी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या टोल दरवाढीच्या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करीत असल्याचे स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.