ठाण्यातील नालेसफाईच्या अपूर्ण कामाविरोधात मनसेचे नाल्यात उतरून आंदोलन; क्रिकेट खेळून केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:17 PM2022-05-30T16:17:48+5:302022-05-30T16:20:15+5:30

ठाणे महानगरपालिकेने प्रभाग समिती निहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून प्रभाग समितीचे अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या डोळत धूळ फेकत असल्याचे समोर येत आहे.

MNS protests against incomplete sanitation work in Thane; Opposed by playing cricket | ठाण्यातील नालेसफाईच्या अपूर्ण कामाविरोधात मनसेचे नाल्यात उतरून आंदोलन; क्रिकेट खेळून केला विरोध

ठाण्यातील नालेसफाईच्या अपूर्ण कामाविरोधात मनसेचे नाल्यात उतरून आंदोलन; क्रिकेट खेळून केला विरोध

Next

ठाणे- गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका नाले सफाई करत असल्याचे बोलत आहे. अनेक ठिकाणी आयुक्त पाहणीही करत आहेत. मात्र ही नालेसफाई केवळ दिखावूपणा असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. गांधीनगर येथील आयुक्त विपीन शर्मा यांनी १९ मे रोजी नाले सफाईबाबत दौरा केला, पण जशी आयुक्तांनी पाठ फिरवली तसे नाले सफाईचे काम बंद करण्यात आले. हा नाला अर्धवट साफ करून ठेकेदाराने पोबारा केला. या विरोधात मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली याच नाल्यात क्रिकेट खेळत पालिकेच्या कामाबाबत निषेध व्यक्त केला.

ठाणे महानगरपालिकेने प्रभाग समिती निहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून प्रभाग समितीचे अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या डोळत धूळ फेकत असल्याचे समोर येत आहे. ठाण्यातील गांधीनगर येथे मुख्य नाला आहे. या नाल्याच्या परिसरात सुमारे १० हजार झोपट्ट्या असून या परिसरातील सर्व उपनालेही तुडुंब घाणीने भरलेले दिसून येतात. गांधीनगरमधील मुख्य नाल्याची सफाई आयुक्तांसमोर करण्यात येत होती. मात्र आयुक्त पाहणी करून गेले तसे ठेकेदारांनीही काम थांबवत नाले सफाई  बंद केली. सोमवारी  महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने या नाल्यात उतरून ‘हो मी आहे जबाबदार‘ असेल लिहिलेले फलक आयुक्तांच्या फोटो सहित प्रदर्शित करत आंदोलन केले आणि  महापालिकेच्या नाले सफाईचा व आयुक्तांकडून करण्यात आलेल्या दौऱ्याचा निषेध करत नाल्यात उतरून क्रिकेट खेळण्यात आले.

दरवर्षी पालिका नालेसफाई करते, मात्र तरीही ठाण्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पाणी तुंबते तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. नाले सफाई योग्यरित्या केली जात नसल्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरवेळी नालेसफाइ केवळ कागदोपत्री केली जाते प्रत्यक्ष मात्र सफाइ केल्याचे दाखवून काम अर्धवट सोडले जाते. ठाण्यातील ज्या नाल्यांची सफाई केली, असे सांगितले जाते तेथील नाल्याची अवस्था भीषण आहे. ज्या ठिकाणी काही प्रमाणात काम केले त्या ठिकाणी नाल्यातील कचरा नाल्याच्या बाजूलाच टाकलेला दिसून येतो. पालिकेच्या दरवर्षी नालेसफाईच्या गलथान कारभाराविरोधत मनसेच्या वतीने आवाज उठविला जात असून आयुक्तांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी महिंद्रकर यांनी केली आहे.

या अनोख्या आंदोलनात मनसेचे अवदेश सिंह, देवेंद्र कदम, किशोर पाटील, हिरा पासी, राजकुमार गौड, विनोद सोनावणे, राजू गुप्ता, संतोष वाल्मीकी, विवेक गौतम, वैभव ठाकरे सहभागी झाले होते.

महापालिकेने या नाले सफाईबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर योग्य ती कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असे स्वप्नील महिंद्रकर यांनी म्हटले आहे.

Web Title: MNS protests against incomplete sanitation work in Thane; Opposed by playing cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.