धूळ खात पडणारा स्कायवॉक नको; पार्किंग प्लाझा उभारा, सिंघानिया शाळेसमोर पादचारी पुलाला मनसेचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 06:06 PM2021-03-10T18:06:22+5:302021-03-10T18:07:39+5:30
ठाणे शहरातील इतर स्कायवॉकप्रमाणे हा स्कायवॉक धुळखात पडण्यापेक्षा त्या ठिकाणी वाहनतळ उभारल्यास सिंघानिया शाळेबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यासोबतच ठाणेकरांचा कररूपी पैसादेखील वाचेल, असा पर्यायदेखील मनसेने सुचवला आहे. (Thane Municipal Corporation)
ठाणे- कोरोना काळात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना कोट्यवधी रुपये खर्चून समतानगर ते सिंघानिया शाळा, असा अनावश्यक स्कायवॉक उभारण्यापेक्षा रेमंड कंपनीच्या सुविधा भूखंडावर वाहनतळ उभारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
ठाणे शहरातील इतर स्कायवॉकप्रमाणे हा स्कायवॉक धुळखात पडण्यापेक्षा त्या ठिकाणी वाहनतळ उभारल्यास सिंघानिया शाळेबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यासोबतच ठाणेकरांचा कररूपी पैसादेखील वाचेल, असा पर्यायदेखील मनसेने सुचवला आहे.
ठाण्यातील समतानगर ते सिंघानिया शाळा, अशा बांधण्यात येणाऱ्या पादचारी पूलाचे नुकतेच भूमीपूजन करण्यात आले. ३ कोटी ७० लाख रुपये खर्चून पालिका प्रशासन या ठिकाणी स्कायवॉक उभारणार आहे. मात्र या भागात महत्त्वाची समस्या रस्ता ओलांडणे नसून शाळेबाहेरील पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी ही आहे. रस्त्याच्या एका बाजूला सिंघानिया शाळा तर समोरील बाजूला सत्कार हॉटेल, दफन भूमी असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांना स्कायवॉकचा उपयोग शून्य आहे. तर सिंघानिया शाळेत शिकणारे विद्यार्थी संपूर्ण ठाणे शहरातून येतात. त्यातील बहुतांश पालक स्वत:ची गाडी घेऊन येतात. त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुलाची गरज नाही. तर शालेय विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी रेमंड येथील ३१३१३ चौरस मीटर सुविधा भूखंड विकसीत करून पार्कींगची सोय करावी. जेणेकरून विद्यार्थी व पालकांना रस्ता ओलांडायची वेळच येणार नाही, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापौरांना निवेदनाद्वारे केली आहे.
विकासकामार्फत पार्किंग प्लाझा उभारा -
रेमंडच्या सुविधा भूखंडावर विकासकामार्फत पार्किंग प्लाझा उभारल्यास ठाणेकरांचे पैसे वाचतील. शहरात असे बरेच प्रकल्प विकासकांमार्फत बांधून घेऊन त्याबदल्यात त्यांना अतिरिक्त एफएसआय देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना काळात महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना अतिरिक्त पैसा खर्च होणार नाही, अशी मागणी मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. तसेच कॅडबरी जंक्शन येथे मुंबईला जाण्यासाठी बसेस थांबतात तेथे प्रवाशांची रस्ता ओलांडताना गैरसोय होते त्याकरिता सबवे (भुयारी मार्ग) बांधण्यात यावा, असेही पाचंगे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
'या' स्कायवॉकना वाली नाही!
ठाण्यात तीनहात नाका येथील रहेजा गृहसंकुल तसेच जुन्या पासपोर्ट कार्यालयानजीक काही वर्षांपूर्वी ठाणे पालिका प्रशासनाने स्कायवॉक उभारले आहेत. हे दोन्ही स्कायवॉक सद्यस्थितीत धूळखात पडले असून त्यांचा वापर होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन स्कायवॉक गरज नसताना ते ठाणेकरांच्या माथी मारण्यापेक्षा या पैशांचा योग्य प्रकल्पात विनियोग करावा, असे संदीप पाचंगे यांनी सांगितले.
आम्ही मनसेचे ऐकायचे का? हा विषय पावणे दोन वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा मंजूर करण्यात आला होता. विरोध करायचा होता तर तेव्हा करायला हवा होता. या कामाचे टेंडरदेखील निघाले. कोरोनामुळे काम थांबले होते. सिघानिया शाळेचे पालक, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांची ही मागणी होती. त्यांच्या मागणीवरून पादचारी पूल उभारला जात आहे. मनसेने ही मागणी तेथील स्थानिक नगरसेवकाकडे करावी, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.