लाखाच्या हमीलाही मनसेचा नकार, राज ठाकरे यांच्या निर्णयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:00 AM2017-11-21T03:00:04+5:302017-11-21T03:00:15+5:30
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी बजावलेल्या जामीन नोटिसीतील हमीची रक्कम ठाणे पोलिसांनीही पुन्हा एकदा घटवून एक कोटीवरून आता एक लाखांवर आणली आहे.
ठाणे : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी बजावलेल्या जामीन नोटिसीतील हमीची रक्कम ठाणे पोलिसांनीही पुन्हा एकदा घटवून एक कोटीवरून आता एक लाखांवर आणली आहे. परंतु, ही एक लाखाची रक्कमही भरणार नसल्याचा पवित्रा आता जाधव यांनी घेतला आहे. याबाबत, पक्षप्रमुख राज ठाकरे जो आदेश देतील, त्याचे आम्ही पालन करू, असे त्यांनी सांगितले.
फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरिता जाधव यांच्याकडे एक कोटीच्या जामिनाची मागणी करणारी नोटीस नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी अभय सायगावकर यांनी बजावली होती. ती आल्यावर मनसेतून नाराजीचा सूर उमटू लागला. त्यानंतर, याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेत हमी रक्कम एक कोटीवरून पाच लाख करण्यात आली. परंतु, या हमी रकमेविरोधात हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले होते. एक कोटीची हमी रक्कम रेल्वे प्रशासनाने भरायला हवी. ती आमच्यावर का टाकता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर, पोलिसांनी जाधव यांना पुन्हा एकदा नोटीस बजावली असून तीत हमी रक्कम कमी करून एक लाखांवर आणली आहे.
याबाबत, जाधव यांना विचारले असता ही रक्कम आम्ही भरणार नसून याबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>कोर्टात गेल्याचा दावा
सराईत गुन्हेगारालाही १५ हजारांपर्यंत जामीन देण्याची पद्धत असताना ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी बॉण्डबाबत घेतलेला निर्णय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी बाधक ठरेल. याविरोधात कोर्टात गेल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितले.