ठाण्यातील सुधाकर चव्हाणांना मनसेचा ‘राज’मार्ग खुला?
By जितेंद्र कालेकर | Published: October 7, 2018 11:30 PM2018-10-07T23:30:45+5:302018-10-07T23:30:45+5:30
आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणी करायची असल्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत मनसेला सुधाकर चव्हाण यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे बोलले जाते.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्टÑ नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि मनसेचे एकेकाळचे ठाण्यातील सर्वेसर्वा, माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण ठाण्यातील व्यासपीठावर तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले. अर्थात, चव्हाण यांना मनसेकडून ‘आॅफर’ असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती. मात्र, आपण मनसेच काय, कोणत्याही पक्षामध्ये जाऊ शकतो, केवळ ‘स्थळ’(अर्थात बोलावणे) येण्याची वाट पाहत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेत एकेकाळी अपक्ष नगरसेवकांची एकहाती मोट निवडून आणणारे ‘भाई’ म्हणून चव्हाण यांच्याकडे पाहिले जात होते. पुढे त्यांनी मनसेतून स्वत:सह पुतणी तेजश्री चव्हाण तसेच राजश्री नाईक, ऋचिता मोरे, शैलेश पाटील असे सात नगरसेवक २०१४ मध्ये निवडून आणले होते. २०१५ मध्ये स्थायी समिती निवडणुकीच्यावेळी अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांनी सदस्यपदासाठी शैलेश पाटील यांचे नाव सूचित केले होते. त्यानुसार, राज ठाकरे यांनीही या नावाला पसंती दर्शवली होती. परंतु, चव्हाण यांनी मात्र सात जणांच्या चिठ्ठीतून राजश्री नाईक यांचे नाव दिले होते. त्यामुळे पक्षशिस्त न पाळल्याने चव्हाण यांची त्यावेळी पक्षातून हकालपट्टी झाली. त्यामुळे सुधाकर चव्हाण, तेजश्री चव्हाण आणि राजश्री नाईक पक्षातून बाहेर पडले. ऋचिता मोरे, शैलेश पाटील हे शिवसेनेत गेले. त्यावेळी एकमेव पक्षात राहिलेल्या रत्नप्रभा पाटील यांनीही भाजपाची वाट धरली. २०१७ मध्ये राजश्री नाईक यांनी पुन्हा मनसेतूनच ठामपाची निवडणूक लढवली. त्या पराभूत झाल्या. २०१५ मध्येच एका बिल्डरच्या आत्महत्या प्रकरणात सुधाकर चव्हाण यांना अटक झाली. दरम्यान, सुधाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून २०१७ मध्ये पालिकेची निवडणूक लढवली. पण, ते पराभूत झाले. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणी करायची असल्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत मनसेला सुधाकर चव्हाण यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे बोलले जाते. त्यातूनच मध्यंतरी एका पदाधिकाऱ्याने तसे बोलूनही दाखवले होते. रविवारी ठाण्यात एका नेत्रालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तीन वर्षांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि सुधाकर चव्हाण हे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले. योगायोगाने ‘राज’कारणात नेत्यांमध्ये दूददृष्टीचा अभाव असल्याची खंतही राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली. हा इशारा कोणाकडे होता, यावरूनही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
-----------------------
‘‘आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ बोलावणे येण्याची वाट पाहतोय. योग्य वाटले तर होकार देऊ. पण, एखाद्या कार्यक्रमाला आलो म्हणजे लगेच मनसेमध्ये चाललो, असे होत नाही.’’
सुधाकर चव्हाण, माजी गटनेते, मनसे, ठामपा