भाजपच्या जाहिरातबाजीला 'मनसे' प्रत्युत्तर, डोंबिवली विमानतळाचे केले प्रतीकात्मक भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 04:30 PM2019-09-14T16:30:31+5:302019-09-14T16:47:48+5:30
भाजपाच्या जाहिरातबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आज प्रतीकात्मक आंदोलन केले.
डोंबिवली - कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा समस्या आहे. तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याने लोकांचा जीव जात आहे. तसेच मध्य रेल्वेचा प्रवास जीवघेणा आहे. या सगळ्य़ा समस्यांनी कल्याण डोंबिवलीकर त्रस्त असताना भाजप सरकारने कोटय़ावधी रुपये विकास प्रकल्पांसाठी खर्च केल्याची जाहिरातबाजी निवडणूकीच्या तोंडावर सुरू केली आहे. या जाहिरातबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आज प्रतीकात्मक आंदोलन केले. डोंबिवली पश्चिमेला मोठा गाव ठाकूर्ली येथे 30 एकर जागेवर 3 हजार कोटी रुपये खर्चाचे विमानतळ उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजन करून भाजपच्या जाहिराबातीला सडेतोड उत्तर दिले आहे. मनसेचे हे आंदोलन लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरले आहे.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आंदोलनात मनसेचे विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, नगरसेविका सरोज भोईर, पदाधिकारी हर्षद पाटील, राहूल कामत, सागर जेधे, परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, वेद पांडे, महिला आघाडीच्या मंदा पाटील, प्रतिभा पाटील,दीपीका पेंडणोकर, स्मिता भणगे, सुमेधा थत्ते आदी उपस्थित होते. मनसेने भूमीपूजनासाठी मोठा मंडप उभारला होता. तसेच पूजन करण्यासाठी भटजींना पाचारण केले होते. विमानतळाच्या प्रकल्पाची मोठी जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे अनेक डोंबिवलीकरांनी खरोखरच विमानतळ उभारले जात आहे का अशी विचारणा मनसेच्या कार्यकर्कत्यांकडे केली होती. यावेळी मनसेचे काही कार्यकर्ते अरब वेशभूषा धारण करुन आले होते. त्यांनी तीन हजार कोटीचा धनादेश अरब राष्ट्राकडून विमानतळासाठी निधीच्या स्वरुपात देत असल्याचे नाट्य त्याठिकाणी उभे केले. त्याचबरोबर पत्रीपूल आणि कोपर पूल उभारला तर आणखीन दोन हजार कोटी अरब राष्ट्राकडून दिले जातील असेही यावेळी सांगण्यात आल्यावर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांच्या चक्क भुवया उंचावल्या.
भूमीपूजनापश्चात हवेत सोडण्यात येणा-या फुग्यांच्या गुच्छांला खेळण्यातील प्लास्टिक विमाने बांधून ती हवेत सोडण्यात आली. प्रत्येक विमानाला भाजपच्या आश्वासनाचे नाव दिले गेले होते. साडेसहा हजार कोटीचे आश्वासन हवेत उडाले. पत्री पूल, कोपर पूल, मोठा गाव ठाकूली, 27 गावांची नगरपालिका या आश्वासनांची उड्डाणो हवेत सोडली गेली.