'उत्तर' सभा संध्याकाळी पण राज ठाकरे दुपारीच लावणार ठाण्यात हजेरी!, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:19 AM2022-04-12T08:19:20+5:302022-04-12T08:19:47+5:30
राज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.
राज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. सायंकाळची होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन ते दुपारीच ठाण्यात मुक्कामी येणार आहेत. यावेळी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात ते मनसे पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहेत. ते दुपारीच येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी सज्ज केलेल्या चारचाकी आणि दुचाकीस्वारांची तयारी दुपारीच करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी हजार दुचाकीस्वार
प्रदीर्घ कालावधीनंतर ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. मंगळवारी होणाऱ्या उत्तरसभेत ते काय बोलणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे. परंतु, त्यासाठी शहर मनसेने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी हातात भगवे झेंडे घेऊन तब्बल २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थळापर्यंत आणण्यात येणार आहे. एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग या सभेच्या निमित्ताने फुंकले जाणार असल्याचे दिसत आहे.
वसंत मोरे म्हणतात शंभर टक्के समाधानी, मनसेतच राहणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत मांडलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारे मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण १०० टक्के समाधानी असून आपण पक्षातच राहणार असल्याचे मोरे म्हणाले. भूमिका मांडण्यापूर्वी संपर्क का साधला नाही, असा प्रश्न करत पक्षनेतृत्वाने मोरे यांना बैठकीत सुनावल्याचे समजते. तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे मंगळवारी ठाण्यात होणाऱ्या सभेत देतील, अशी माहितीही त्यांनी दिली. भेटीनंतर मोरे म्हणाले की, माझ्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. मला मंगळवारच्या ठाण्यातील सभेसाठी बोलविण्यात आले आहे.