उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर मनसेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 06:26 PM2020-08-17T18:26:21+5:302020-08-17T18:27:00+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील बेवास चौक परिसरात महापालिका शाळा क्र -३, राणी लक्ष्मीबाई ही शाळा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. विद्यार्थिनी पटसंख्या अभावी शाळा बंद आहे. १३ आॅगस्ट रोजी काही भु-माफियांनी महापालिका शाळेचे बांधकाम तोडत असल्याची कुणकुण मनसे विद्यार्थी संघटनेचे मनोज शेलार यांना मिळाल्यावर त्यांनी शाळेला भेट दिली.
उल्हासनगर - महापालिका शाळा इमारतीची नासधुस करून जागा हडप करणाऱ्यां भुमाफियावर व सबंधित पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करुन आयुक्तांना निवेदन दिले. शाळा अतिक्रमण मागे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा शहरात रंगली असून महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील बेवास चौक परिसरात महापालिका शाळा क्र -३, राणी लक्ष्मीबाई ही शाळा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. विद्यार्थिनी पटसंख्या अभावी शाळा बंद आहे. १३ आॅगस्ट रोजी काही भु-माफियांनी महापालिका शाळेचे बांधकाम तोडत असल्याची कुणकुण मनसे विद्यार्थी संघटनेचे मनोज शेलार यांना मिळाल्यावर त्यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळा इमारत तोडून इमारत खोल्यातील सामान नेत होते. शेलार यांनी जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त, महापौर, ,उपमहापौर, शिक्षण मंडळ, विरोधी पक्ष नेते, राज्य शासनाने आदींना पत्र पाठवून हडप होत असलेली शाळा वाचविण्याची विनंती केली. त्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख व महापालिका सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी पदाधिकारी यांच्यासह भेट दिली. यावेळी बांधकामावर काम करणाऱ्या एकाला चोप दिला.
शिवसेना शहरप्रमुख व महापालिका सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी महापालिका आयुक्त यांना शाळेचा विषय सांगून उल्हासनगर पोलिस ठाणे गाठले. शहरात होत असल्याचा प्रकारा बाबत माहिती पोलिसांना दिली. दरम्यान भुमाफियाने शाळा जागेवर रात्री काम सुरू करून लोखंडी गेट लावण्याचे काम सुरू केले. याबाबतची माहिती चौधरी यांना मिळाल्यावर सोमवारी रात्री ११ वाजता महापालिकेला अवैध बांधकाम व लोखंडी गेट तोडण्यास भाग पाडले. ८ महिन्या पूर्वी मालमत्ता विभाग प्रमुख विशाखा सावंत यांनी बंद असलेल्या शाळेच्या ठिकाणी, सदर मालमत्ता उल्हासनगर महानगरपालिकेची आहे. असा फलक लावल्याची माहिती शेलार यांनी दिली. या प्रकाराने भूखंड, खुल्या जागा हडप करण्याची चर्चा सुरू झाली असून उच्चस्तरीय चौकशी झाल्यास मोठे माशे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, मालमत्ता विभागाचे अधिकारी, प्रभाग अधिकारी, बीट मुकादम व अभियंता शिक्षण विभाग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तत्काळ निलंबित करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
महापालिका भूखंडावर अतिक्रमण?
महापालिका शाळेवर अतिक्रमण झाल्याने सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, महापालिका उपमहापौर भगवान भालेराव यांनी विठ्ठलवाडी येथील अंब्रोसिया हॉटेल येथील पालिका भूखंड, टेलिफोन एक्सचेंज येथील ७०५ नावाच्या भूखंडावर अवैध बांधकामे, महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयावर अवैध बांधकामाची माहिती दिली. महापालिका मालमत्तेवर अतिक्रमण होत असताना महापालिका आयुक्त, सबंधित अधिकारी कारवाई का? करीत नाही. असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. तसेच महापालिका सत्ताधारी शिवसेना व मित्रपक्ष, विरोधी पक्ष भाजपा याबाबत गप्प का? असा प्रश्न निर्माण होऊन सर्वत्र झोल असल्याची टिका होत आहे.