भिवंडी महापालिकेच्या अभियंत्यावर कारवाईसाठी मनसेचे साखळी उपोषण
By नितीन पंडित | Published: January 10, 2023 05:07 PM2023-01-10T17:07:19+5:302023-01-10T17:07:43+5:30
भिवंडी महापालिकेच्या अभियंत्यावर कारवाईसाठी मनसेने साखळी उपोषण आंदोलन केले.
भिवंडी : भिवंडी महानगरपालिका अभियंता सचिन नाईक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण न ठेवल्यानेया भागात निकृष्ट रस्ते व गटार बांधले गेले आहेत. यास सर्वस्वी अभियंता सचिन नाईक हे जबाबदार असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय प्रवेशद्वारे मंगळवारी सकाळपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
अभियंता सचिन नाईक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेषतः भादवड ,टेमघर पाडा,सुभाष नगर या भागात रस्ते दुरुस्ती करीत असताना काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना खुश करण्यासाठी काम करीत असताना इतरत्र मात्र रस्ते दुरुस्ती ही नागरीकांना त्रासदायक ठरेल अशी केली आहे.भादवड मुख्य रस्त्या वरील सद्यस्थितील सुरु असलेले कामाच्या दर्जाबाबत गुळवी यांनी नाराजी व्यक्त केली असून प्रभाग समिती क्षेत्रात गटार बनवीत असताना त्या तकलादू स्वरूपाच्या बनविल्या आहेत असा आरोपही मनसे शहरप्रमुख मनोज गुळवी यांनी केला आहे.या बाबत पालिका आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी देऊन ही कारवाई न झाल्याने आम्ही या सनदशीर मार्गाने आंदोलन करून प्रशासनाकडे निलंबनाची मागणी करीत असल्याचे सांगत जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील असा इशारा मनसे शहरप्रमुख मनोज गुळवी यांनी दिला आहे.
भादवड टेमघर पाडा परिसरात सुरू असलेले रस्ते दुरुस्तीचे काम हे वार्षिक निविदे अतंर्गत सुरु असुन सध्यस्थितीत एका थराचे काम झाले आहे.अद्याप रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण केलेले नाही. दरम्यान पालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या विकास कामांचे तत्रस्थ तांत्रिक लेखा परिक्षण व गुणवत्ता चाचणी केली जात असुन विकास कामात दोष दायित्व कालावधी अंतर्गत उणीवा झाल्यास संबंधित कंत्राटदारामार्फत त्याची दुरुस्ती केली जाते.तरी आंदोलन स्थगित करावे अशी विनंती शहर अभियंता सुनील घुगे यांनी लेखी पत्राद्वारे आंदोलनकर्त्यांना केली आहे.