धोकादायक इमारती बाबत उल्हासनगर महापालिका आयुक्तांना मनसेचे निवेदन
By सदानंद नाईक | Published: September 23, 2022 07:03 PM2022-09-23T19:03:01+5:302022-09-23T19:03:28+5:30
मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले.
उल्हासनगर: मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करूनही परिपत्रक प्रसिद्ध का केले नाही. याबाबत जाब विचारला. उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून गुरूवारी मानस इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. एका महिन्यात तीन इमारतीचे स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून शासन किती बळी गेल्या नंतर धोकादायक इमारती बाबत परिपत्रक काढणार असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.
मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी दुपारी १२ वाजता भेट घेऊन अनेक प्रश्नांचा भडीमार करून निवेदन दिले आहे. शहरात सातत्याने कोसळणाऱ्या इमारतीच्या दुर्घटनेत जाणारे नागरिकांचे बळी हे कधी थांबणार, राज्य शासन धोकादायक इमारतींबाबत कधी निर्णय घेणार, धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी कमेटी स्थापन करून आज जवळपास वर्ष होत आले आहे, मात्र निर्णय कधी, विधानसभेतील मुख्यमंत्री यांच्या घोषणेला महिना उलटला तरी आदेश नाही आदी प्रश्न मनसे शिष्टमंडळाकडून करण्यात आले.
शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लावल्या जाणारी दंडाची रक्कम ही सन २००६ च्या रेडिरेकणरच्या ५० टक्के आकारण्यात यावी. असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या इमारती बाबत योग्य निर्णय घेण्याचे मतही यावेळी अनेकांनी व्यक्त केले. आयुक्त अजीज शेख यांनी धोकादायक इमारती बाबत विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून महापालिका लवकरच धोकादायक इमारतींवर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा सचिव संजय घुगे, मैन्नुद्दीन शेख यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.