Coronavirus: आई कोरोनाबाधित तर वडील झाले क्वारंटाईन: मनसेने घेतली नवजात कन्येची जबाबदारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 09:29 PM2020-06-15T21:29:14+5:302020-06-15T21:30:28+5:30
कोरोना अहवालाच्या गोंधळामुळे मन:स्ताप सहन करावा लागलेल्या या महिलेला मनसेने मदत केली होती.
ठाणे: मनसेने मदत केलेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला रविवारी कन्यारत्नाचा लाभ झाला. दुर्देवाने आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे वडिलांनाही क्वारंटाईन रहावे लागले. त्यामुळे या नवजात बाळाच्या संगोपनासाठी मनसेने पुढाकार घेतला असून मनसेच्या उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कन्डे यांनी या बाळाची सोमवारी जबाबदारी घेतली.
कोरोना अहवालाच्या गोंधळामुळे मन:स्ताप सहन करावा लागलेल्या या महिलेला मनसेने मदत केली होती. तिने 14 जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आईला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नवजात बाळाच्या वडिलांनाही विलगीकरणात रहाणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या नवजात कन्येच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मनसेच्या महिला उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कन्डे यांनी त्या नवजात कन्येच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. तिला समीक्षा यांनी सोमवारी रुग्णालयातून आपल्या कोपरी येथील घरी नेले. त्यावेळी ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि शहर सचिव निलेश चव्हाण हे उपस्थित होते.