मनसेच्या धमकीने उल्हासनगर महापालिकेला छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:06 PM2019-05-20T23:06:11+5:302019-05-20T23:06:25+5:30
उल्हासनगर : मनसेच्या महापालिकेला टाळे ठोकण्याच्या धमकीमुळे सोमवारी पालिका मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. शहराध्यक्ष बंडू देशमुख व ...
उल्हासनगर : मनसेच्या महापालिकेला टाळे ठोकण्याच्या धमकीमुळे सोमवारी पालिका मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. शहराध्यक्ष बंडू देशमुख व कामगार संघटनेचे नेते दिलीप थोरात यांच्यासोबत पोलिसांनी महापालिकेत चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.
उल्हासनगर महापालिका मुख्यालयात दोन आठवड्यांपूर्वी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना मनसेचे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी शिवीगाळ केली होती. सदर प्रकरणी कामगार संघटनेने एक दिवस ‘कामबंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शिवीगाळ झाली, त्यावेळी उपस्थित असलेल्या सहापैकी पाच सुरक्षारक्षकांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून आयुक्तांनी त्यांना निलंबित केले. सुरक्षारक्षकांना बळीचा बकरा बनवले जात असून त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी मनसेने आयुक्त हांगे यांना भेटून केली. निलंबन मागे न घेतल्यास महापालिकेला टाळे ठोकणार असल्याची धमकी दिली. मनसेच्या धमकीने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले व त्यांनी पोलीस संरक्षण मागितले.
राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात केली होती. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरडकर यांनी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख व कामगार नेते दिलीप थोरात यांना महापालिकेत बोलावून त्यांची समजूत काढली. सुरक्षारक्षकांना तातडीने कामावर घेतले नाही, तर मनसे आंदोलन करील, अशी प्रतिक्रिया पत्रकारांना देशमुख यांनी दिली.