मनसे ठाणे, पालघर लोकसभा लढणार; राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक
By अजित मांडके | Published: August 17, 2023 05:22 PM2023-08-17T17:22:39+5:302023-08-17T17:24:26+5:30
"गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात चर्चा झाली..."
ठाणे : आगामी लोकसभा निवडणुक लढण्यासाठी मनसे देखील सज्ज झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यातील तीन आणि पालघरची एक जागा अशा चार जागा मनसे लढणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात चर्चा झाली असून उमेदवार देखील निश्चित झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मागील काही महिन्यापासून मनसेने ठाण्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरासह जिल्ह्यात आधीच भाजपने डोके दुखी वाढविली आहे. त्यात काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात हजेरी लावून शिंदे गटाला आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता मनसे थेट लोकसभा निवडणुक लढण्याचे जाहीर करुन शिंदे गटाला मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत त्या दृष्टीने मोर्चे बांधणी कशी करायची याची चर्चा झाली असून पुढे जाऊन कार्यकर्त्यांनी काय कराव, पदाधिकाऱ्यांनी काय करावे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती जाधव यांनी दिली. तसेच पुढील सहा महिन्यात महाराष्टÑ सैनिक घराघरात पोहचणार असल्याचेही सांगण्यात आले.
आताच्या घडीला भाजपमध्ये आलेले आमदार, खासदार मोजा ते कुठुन आलेले आहेत, राष्टÑवादी, कॉंग्रेस, मनसे, शिवसेनेतून आलेल्या लोकांची फळी भाजपने बांधलेली आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या आमदारांना घेऊन संघटना बांधलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असा इशाराही जाधव यांनी दिला. आमचा एक आमदार आहे तो देखील आमचा हक्काचा आहे. येणाऱ्या चार दिवसात मनसेत मोठा प्रवेश होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान या बैठकीत कळवा रुग्णालया संदर्भात राज ठाकरे यांनी माहिती घेतली असून बळी कशामुळे गेले आहेत, त्याची माहिती घेतली पाहिजे अशी सुचना त्यांनी केली. तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण सारख्या अनेक शहरात खड्डे पडले असून प्रशासनाला जागे करण्यासाठी लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याच्या सुचनाही राज यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
कळवा रुग्णालयात जाणे टाळले
कळवा रुग्णालयात मृत्युचे तांडव झाल्यानंतर गुरुवारी राज ठाकरे देखील त्याठिकाणी जातील अशी शक्यता होती. किंबहुना ते त्याच मार्गे पुढे दौऱ्यासाठी गेले. मात्र त्यांनी कळवा रुग्णालयात जाणे टाळले. केवळ तेथील रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून त्याठिकाणी जाणे टाळल्याचा दावा जाधव यांनी केला. तर आयुक्तांशी चर्चा करुन जे जे रुग्णालयमध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत, त्या धर्तीवर कळवा रुग्णालयात काय करता येईल का? याची चर्चा करावी अशा सुचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी त्यांच्या वर्ग मैत्रीण असलेल्या अशिलता राजे यांची त्यांची घरी जाऊन भेट घेतली. दादर येथील बालमोहन शाळेत ते एकत्र होते.