दुकानदारांना मनसेचा दोन दिवसांचा अल्टिमेटम; दोन दिवसांत पाट्या न लावल्यास मनसे स्टाईलने पुन्हा आंदोलन करणार
By अजित मांडके | Published: December 4, 2023 08:19 PM2023-12-04T20:19:09+5:302023-12-04T20:19:27+5:30
ठाण्यात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
ठाणे : ठाण्यात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ठाण्यातील दुकानदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. विशेष करून ग्ल्याडी अल्वारीस रोड, पोखरण रोड दोन या भागातील दुकानदारांनी अद्याप मराठीत पाट्या न लावल्याने मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दोन दिवसांत मराठी पाट्या न लावल्यास पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
शहरातील दुकानांवर मराठी पाट्या करण्यासंदर्भात न्यायालयाने मुदत देऊनही बाजारपेठांमध्ये अजूनही इंग्रजी पाट्या झळकत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले होते. मात्र हे आंदोलन होऊनही ठाण्यातील काही ठिकाणी तसेच ग्ल्याडी अल्वारीस रोड, पोखरण रोड दोन या भागातील दुकानदारांनी अद्याप मराठीत पाट्या न लावल्याने स्वप्नील महिन्द्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष मनीष सावंत, देवेंद्र कदम, हिरा पासी यांनी नियमांना हरताळ फासणाऱ्या दुकान मालकांना तात्काळ याप्रश्नी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन दिले आहे. येत्या दोन दिवसांत याठिकाणी मराठी पाट्या न दिसल्यास मनसे स्टाईल दणका दिला जाईल, असा इशारा मनसेच्या या पदाधिकाऱ्यांनी दिला.
मराठी पाट्यांच्या तपासणीसाठी १२ दुकान निरीक्षकांवर जबाबदारी
दुकानांवर मराठीत ठळक अक्षरात पाट्या लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार दुकाने, हॉटेल, आस्थापनांच्या मराठी पाट्यांच्या तपासणीची जबाबदारी १२ दुकान निरीक्षकांना कामगार विभागाकडून देण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ डिसेंबरपर्यंत या मोहिमेनुसार जिल्ह्यातील दुकानांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ अंतर्गत मराठी देवनागरी लिपीचा फॉन्ट लहान असू नये, अशी नियमावली जाहीर केलेली असताना ठाण्यातील अनेक दुकानांमध्ये अद्यापही मराठी पाट्यांची वानवा आहे.