ठाण्यातील वाचनालय, पाणपोईच्या दुरावस्थेकडे मनसेने वेधले लक्ष, दुरूस्त होईपर्यंत पत्रव्यवहार चालूच राहणार - मनसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:50 PM2017-12-10T15:50:29+5:302017-12-10T15:53:53+5:30
दुरावस्थेत असलेले वाचनालय व पाणपोई लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांसाठी उपलबद्ध करून देण्याची मागणी मनसेने केली आहे.
ठाणे: मनोरमा नगर येथील गेल्या काही वर्षांपासून दुरावस्थेच्या विळख्यात सापडलेल्या पाणपोई, वाचनालयाकडे मनसेने लक्ष वेधले आहे. पाणपोई, वाचनालयाच्या दुरावस्थेकडे महापालिकेबरोबर लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असून जोपर्यंत दुरूस्ती होत नाही तोपर्यंत पत्रव्यवहार करीत राहणार असा इशाराही मनसेने दिला आहे.
मनोरमा नगर येथील शंकर मंदिराच्या बाजूला असलेल्या पाणपोई, वाचनालय गेल्या काही वर्षांपासून दुरावस्थेत पडले आहे. वाटसरुंची तहान भागावी म्हणून पाणपोई तर परिसरातील नागरिकांना वृत्तपत्र वाचायला मिळावीत यासाठी वाचनालय उभारण्यात आले होते. परंतू या वास्तूची ना महापालिकेकडून , ना लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जात आहे असा आरोप मनविसेचे विभाग अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी माजीवाडा - मानपाडा प्रभाग समितीला निवेदन दिले आहे. एखादी वास्तू प्रभागात उभारली की त्याकडे कोणाचेही लक्ष नसते, नागरिकांना मोफत वाचनालय, पाणपोई अशा सुविधा देऊन त्याची डागडुजी करीत नसाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. हळूहळू या वास्तू दुरावस्थेच्या विळख्यात सापडत जातात आणि नंतर त्या ठिकाणी कचºयाचे साम्राज्य उभे राहते व पार्किंग झोन निर्माण होतो असे पत्ताडे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेच्या निधीचा गैरवापर होत असून पाणपोई आणि वाचनालयाचा नागरिकांना उपभोग घेता यावा यासाठी ते तातडीने दुरूस्त करुन नागरिकांसाठी उपलब्ध करावे अशी मागणी या निवेदनात मनसेने केली आहे. परंतू निवेदन दिल्यानंतर डागडुजी झाली नाही तर जोपर्यंत या वास्तू दुरूस्त होत नाही तोपर्यंत मनसेचा पत्र्यववहार सुरूच राहील असे पत्ताडे यांनी सांगितले आहे.