मनसेच्या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा पदाधिकारीच अधिक! केवळ दीड ते दोन हजार शेतकरी, कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 04:48 AM2019-05-18T04:48:28+5:302019-05-18T04:48:48+5:30

मागील आठवड्यात ठाण्यात शेतक-यांच्या आंबा स्टॉलच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आपसात भिडले होते.

MNS workers are more office-bearers than farmers! Only half to two thousand farmers, activists participate | मनसेच्या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा पदाधिकारीच अधिक! केवळ दीड ते दोन हजार शेतकरी, कार्यकर्ते सहभागी

मनसेच्या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा पदाधिकारीच अधिक! केवळ दीड ते दोन हजार शेतकरी, कार्यकर्ते सहभागी

Next

ठाणे : मनसे आणि भाजपमध्ये मागील आठवड्यात ठाण्यात आंबा स्टॉलवरून वाद झाला होता. त्याचा निषेध म्हणून अन् शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने शुक्रवारी ठाणे महापालिकेवर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढला. या मोर्चात ५ ते १० हजार शेतकरी सहभागी होतील, असा दावा पक्षाने केला होता. परंतु, प्रत्यक्षात दीड ते दोन हजार लोकच सहभागी झाले होते व राज्यभरातून अवघे १०० च्या आसपासच शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चात शेतकऱ्यांऐवजी मनसेचे पदाधिकारीच जास्त प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मोर्चा शेतकऱ्यांचा की मनसे पदाधिकाऱ्यांचा, असा सवाल करण्यात येत होता.

मागील आठवड्यात ठाण्यात शेतकऱ्यांच्या आंबा स्टॉलच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आपसात भिडले होते. त्यानंतर, हा वाद शमेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात मनसेने ठाण्यात शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्याचे जाहीर केले. शुक्रवारी दुपारी १ वाजता गावदेवी मैदानाजवळून तो निघणार होता. परंतु, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात वेळ गेल्याने हा मोर्चा २.३० वाजण्याच्या सुमारास निघाला. या मोर्चाला सुरुवात झाली, त्यावेळी बैलगाड्यांसह डोक्यावर भाजीच्या टोपल्या घेऊन शेतकऱ्यांसह मनसेचे पदाधिकारी ‘चौकीदार चोर है’, या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची १० कुटुंबे

या मोर्चात राज्यातील बीड, परभणी आदी भागांतील शेतकरी सहभागी झाले होते. बीडमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची १० कुटुंबेही मोर्चात सहभागी झाली होती. शेतीला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, आघाडीच्या काळात शेतमालाला जो बाजारभाव मिळत होता, तो भाजप सरकारच्या काळात मात्र मिळू शकला नसल्याचा आरोपही या वेळी शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे, सत्तेत येताना भाजप सरकारने जी काही आश्वासने दिली होती, ती पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढला आहे. ठाणे महापालिकेकडे १०० स्टॉलची मागणी केली आहे.
- प्रशांत नवगिरे,
जिल्हाध्यक्ष - उस्मानाबाद, मनसे.

स्वत:हून शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. शासनाने शेतकºयांची पिळवणूक केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. शिवसेना आणि भाजप बोगसगिरी करत असून चारा छावण्यांमध्येही भ्रष्टाचार करत आहेत.
- सुमंत धस,
जिल्हाध्यक्ष, बीड, मनसे

राज्याच्या विविध भागांतून या मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी हा मोर्चा काढला आहे. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह राज्याच्या प्रत्येक शहरात शेतकऱ्यांना स्टॉल मिळावेत, अशी मागणी आहे.
- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष ठाणे, मनसे

सरकारने केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. शेतमालाला अद्यापही हमीभाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफी केल्याचा दावा केला जात असला तरी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांना ती मिळाली आहे. केवळ गाजर विकण्याचेच काम हे शासन करत आहे.
-भागवत शिंदे, जिल्हाध्यक्ष, शेतकरीसेना, लातूर

Web Title: MNS workers are more office-bearers than farmers! Only half to two thousand farmers, activists participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.