ठाण्यात महापालिकेच्या अवघ्या ३० जागा लढविण्याची मनसेची कुवत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 10:02 AM2022-02-19T10:02:36+5:302022-02-19T10:02:50+5:30

आधी भाजपबरोबर जाण्याचा विचार मनसेचा होता. परंतु, अद्याप त्यावर एकमत होत नसल्याने मनसे-भाजप युतीबाबत कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत

MNS's ability to contest only 30 NMC seats in Thane | ठाण्यात महापालिकेच्या अवघ्या ३० जागा लढविण्याची मनसेची कुवत 

ठाण्यात महापालिकेच्या अवघ्या ३० जागा लढविण्याची मनसेची कुवत 

Next

अजित मांडके

ठाणे  : ठाणे  महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वच पक्षांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात आता मनसेदेखील उशिराने का होईना उतरली आहे. मात्र, पक्ष स्वबळावर लढत असल्याने सावध पवित्रा घेऊन अवघ्या ३० जागांची चाचपणी करून तेथे उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. तर, उर्वरित जागा ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपल्या ताकदीवर लढविण्याचा अजब सल्ला पक्षश्रेष्ठींनी इच्छुकांना दिला आहे. 

आधी भाजपबरोबर जाण्याचा विचार मनसेचा होता. परंतु, अद्याप त्यावर एकमत होत नसल्याने मनसे-भाजप युतीबाबत कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे आता ‘एकला चले रो’चा नारा देऊन निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर श्रेष्ठींनी एक बैठक घेतली होती. आगामी निवडणुकीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार शहरातील विविध वॉर्डांची चाचपणी करून ज्या ज्या वॉर्डात मनसेची ताकद आहे, त्याठिकाणी उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. यात ३० जागांवर उमेदवार उभे करण्याचे मनसेने निश्चित झाले आहे. 

दिव्यावर मनसेची नजर
दिव्यात भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता मनसेने येथे आपले लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणाहून मनसेचे एक ते दोन उमदेवार निवडून जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यानुसार याच पट्यातून भोपळा फोडण्याची तयारी मनसेने केली आहे.

पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविणार आहोत, त्यासाठी छोट्या घटकांना एकत्र घेण्याची तयारी आम्ही केली आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही कमी लेखू नये. - अविनाश जाधव, मनसे, ठाणे -पालघर जिल्हाध्यक्ष

पक्षाने वाऱ्यावर सोडले, कार्यकर्ते हैराण

दुसरीकडे इतर ठिकाणी ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या ताकदीवर ती लढवावी असा सल्ला श्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे अवसान  गळाले आहे. स्वत: निवडणूक लढवा याचा नेमका अर्थ काय? असा सवाल हे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. इतकी वर्षे पक्षासाठी झटल्यावर ऐन निवडणुकीच्या तोडांवर पक्ष वाऱ्यावर सोडणार का? अशी भीतीदेखील आता त्यांच्या मनात आहे. त्यामुळे निवडणूक कोणाच्या जीवावर लढवायची असा प्रश्न हे कार्यकर्ते करू लागले आहेत.

Web Title: MNS's ability to contest only 30 NMC seats in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे