फेरीवाला कारवाईवरून मनसेचा दुटप्पीपणा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:18+5:302021-07-02T04:27:18+5:30
मीरा रोड : कोरोना काळात फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही म्हणून फेरीवाले पालिकेचे जावई आहेत का, विचारत तक्रार करायची आणि ...
मीरा रोड : कोरोना काळात फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही म्हणून फेरीवाले पालिकेचे जावई आहेत का, विचारत तक्रार करायची आणि दुसरीकडे महापालिकेने कारवाई केल्यावर मात्र जावई असल्यागत कळवळा दाखवत फेरीवाल्याला नवीन हातगाडी द्यायची, असा मनसेचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.
मीरा रोडच्या नयानगरमधील बाणेगर शाळा गल्ली येथील फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी म्हणून रहिवाशांच्या पालिकेपासून थेट सरकारपर्यंत तक्रारी केल्या जातात. तक्रारींवर या आधीही महापालिकेने कारवाई केली होती. नव्याने तक्रार आल्यावर पालिकेने पुन्हा कारवाई केली. या कारवाईच्या वेळी एक फेरीवाला कामात अडथळा आणत असल्याने पोलिसाने त्याला बाजूला केले. पालिकेने फेरीवाल्याचे हातगाडीवरील साहित्य खाली टाकून हातगाडी तोडल्याचा व्हीडिओ वायरल झाला. पालिकेने हातगाडी तोडली; परंतु कारवाईत अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यावर गुन्हा दाखल केला नाही. परंतु त्या व्हीडिओनंतर मनसेच्या अविनाश जाधव, संदीप राणे या काही नेत्यांनी जाऊन फेरीवाल्याला नवीन हातगाडी दिली व त्याच्याबद्दल कळकळ व्यक्त केली.
फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही म्हणून मनसेचे मीरा रोड उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांनीच कारवाईसाठी महापालिका आयुक्तांना २८ जून रोजी पत्र दिले होते. त्या पत्रात पोपळे यांनी, फेरीवाले हे काय महापालिकेचे जावई आहेत का, असा सवाल करत फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या प्रभाग अधिकारी व फेरीवाला पथकांवर कारवाई करा, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. म्हणजेच एकीकडे फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही म्हणून ते जावई आहेत का, असा सवाल करायचा आणि दुसरीकडे पालिकेने कारवाई केली की मग फेरीवाल्याचा कळवळा व्यक्त करून त्याला हातगाडी द्यायची. यामुळे फेरीवाला पालिकेचा की मनसेचा जावई, अशी चर्चा होऊ लागली आहे.