खळखट्याकनंतर मनसेचा गांधीगिरी मार्ग; टोल दरवाढीविरोधात गुलाब देऊन आंदोलन
By अजित मांडके | Published: October 2, 2023 03:49 PM2023-10-02T15:49:17+5:302023-10-02T15:49:57+5:30
मुलुंड चेकनाका येथे मनसेने चक्क महात्मा गांधीच्या वेशभुषात एका पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून येथील कर्मचाऱ्यांसह वाहन चालकांना गुलाब देऊन गांधीगीरी मार्गाने आंदोलन केले.
ठाणे : वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढीव टोलवाढीच्या विरोधात मागील काही दिवसापासून आंदोलन सुरु आहे. मात्र आधी खळखट्याकाचा आवाज देणाऱ्या मनसेने सोमवारी चक्क गांधीगीरी मार्गाचा अवलंब केल्याचे दिसून आले. मुलुंड चेकनाका येथे मनसेने चक्क महात्मा गांधीच्या वेशभुषात एका पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून येथील कर्मचाऱ्यांसह वाहन चालकांना गुलाब देऊन गांधीगीरी मार्गाने आंदोलन केले.
राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्या स्थितीत रस्त्याची देखभाल करत नसून रस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आले आहेत. तर एकूण असलेल्या ५५ पूलांपैकी फक्त १३ पूल एमएसआरडीसी प्राधिकरणाच्या वतीने देखभाल केले जाते. त्यामुळे प्राधिकरण जर देखभाल करत नसेल तर त्यांच्यामार्फत टोल वसुल करणे चुकीचे आहे.
या विरोधात मनसे आंदोलनाची भूमिका घेतली असून शनिवार पासून त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यानंतर रविवारी ठाण्यातील चौका चौकात आंदोलन करत टोल दरवाढीला विरोध करत मनसे पदाधिकारी यांनी घोषणा देत विरोध दर्शविला होता. त्यानंतर सोमवारी महात्मा गांधी यांच्या जंयत्तीच्या निमित्ताने मनसेचे शहर प्रमुख रवि मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरीच्या मार्गाने मुलुंड चेकनाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रत्येक वाहन चालकांना वेशभुषा केलेल्या गांधींजींनी वाहन चालक आणि टोलवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब दिले.
आज हे शेवटचे शांततेचे आंदोलन आहे. यापुढे शांततेची अपेक्षा मनसेकडून करु नये, असा इशारा यावेळी मोरे यांनी दिला. टोल बंद होणार नसेल मुख्यमंत्री शिंदे यांनी वाढीव टोलवाढ रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आनंद परांजपे यांनी मनसेकडून नौटंकी सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यावर मोरे यांनी उत्तर दिले. परांजपे हे एसीमध्ये लहानाचे मोठे झाले, त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये, जे बाळासाहेबांचे झाले नाही, शरद पवार यांचे नाही झाले, उद्या ते आणखी कुठे जातील हे सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आमची काळजी करु नये अशी टिकाही त्यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.