हॉस्पिटलविरोधात मनसेचे झोपून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:45+5:302021-06-17T04:27:45+5:30
आंदोलनानंतर हॉस्पिटलने केले बिल माफ लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बिलाची उर्वरित रक्कम न भरल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह ...
आंदोलनानंतर हॉस्पिटलने केले बिल माफ
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बिलाची उर्वरित रक्कम न भरल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देणाऱ्या कौशल्या हॉस्पिटलविरोधात मनसेने चक्क झोपून आंदोलन केले. या आंदोलनानंतर अवघ्या काही तासांत हॉस्पिटल प्रशासनाने मृत तरुणाच्या बिलाची उर्वरित संपूर्ण रक्कम माफ केली.
गेले आठ दिवस उपचारांसाठी कौशल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३२ वर्षीय संदीप तिखे या तरुणाचा मंगळवारी (दि. १५) रात्री आठ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. यावेळी त्याचे बिल तीन लाख ३९ हजार झाले होते. नातेवाइकांनी एक लाख २५ हजार इतकी रक्कम आधी भरली होती. दोन लाख १४ हजार रुपये राहिले होते. उर्वरित रक्कम भरली नाही म्हणून त्या तरुणाचा मृतदेह १६ तास हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आला होता, असा आरोप मनसेचे कोपरी-पाचपाखाडीचे विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी केला. मृताच्या नातेवाइकांनी कदम यांच्याकडे बुधवारी सकाळी धाव घेतली. कदम यांनी हॉस्पिटलसमोर झोपून आंदोलन केले. जोपर्यंत ही रक्कम माफ होत नाही तोपर्यंत ते जमिनीवर झोपूनच होते. अखेर हॉस्पिटल प्रशासनाने बिल माफ केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे कदम यांनी सांगितले. नातेवाइकांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या कौशल्या हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यासाठी आज, गुरुवारी ठाणे पोलीस आयुक्त यांना भेटणार असल्याचे कदम यांनी सांगितले. कौशल्या हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनंत नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
--------------------------------
फोटो मेलवर
..........
वाचली