ड्रग्ज विक्रेत्यास अटक करताना जमावाचा पोलिसांवर हल्ला; भाईंदरमधील उत्तन येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:37 PM2024-02-23T12:37:53+5:302024-02-23T12:38:13+5:30
एका महिला पोलिसाचे केस ओढून बांबू मारला व विनयभंग केला. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघा हल्लोखोरांना अटक केली आहे.
मीरा रोड : अमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीला अटक करून नेत असताना अमली पदार्थविरोधी शाखेच्या पोलिस पथकावर १३ ते १८ जणांच्या जमावाने बांबू आणि काठ्यांनी हल्ला चढवला. एका महिला पोलिसाचे केस ओढून बांबू मारला व विनयभंग केला. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघा हल्लोखोरांना अटक केली आहे.
मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी शाखेचे पोलिस निरीक्षक अमर मराठे व ५ पोलिस कर्मचारी असे ६ जण २० फेब्रुवारीला रात्री भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत बेकायदा वसलेल्या धावगी झोपडपट्टी येथे कारवाईसाठी गेले होते. तेथे हनीफ शेख नावाच्या अमली पदार्थ माफियाला पकडून त्याच्याकडून ३२ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला. पोलिस पथक हनीफ याला पकडून नेत असताना नशा केलेले काही तरुण आणि महिला अशा १३ ते १८ जणांच्या जमावाने पोलिसांना घेराव घातला. त्यावेळी जमावाने पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. काहींनी बांबूने पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जमावाने महिला पोलिस लतादेवी एक्कलदेवी यांना बांबूने मारहाण करून जखमी केले, त्यांचे केस ओढले व विनयभंग केला.
आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
या घटनेप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे व पथकाने कारवाई करत अब्बास अली केसर हुसेन मिर्झा (३८), अंकुरकुमार वीरेंद्र भारती (२४) व राजू जयंत्री गौतम (१९) या तिघांना अटक केली असून त्यांना ठाणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, पोलिसांनी एक अल्पवयीन आरोपी सुद्धा ताब्यात घेतले आहेत. अन्य पुरुष व महिला आरोपींचा पोलिस शोध घेत असून लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल, असे दादाराम करांडे यांनी सांगितले.