विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपचा होणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:25 AM2020-08-19T01:25:39+5:302020-08-19T01:26:14+5:30

पाच जणांच्या उपस्थितीत हे विसर्जन पार पडणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली.

The mobile app will be used to avoid crowds during immersion | विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपचा होणार वापर

विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपचा होणार वापर

googlenewsNext

भिवंडी : गणेशमूर्ती विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने लागू केलेल्या अटींनुसार भिवंडी महापालिकेने मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या मोबाइल अ‍ॅपवरून घाटावर विसर्जनाची वेळ गणेशभक्तांना मिळणार आहे. त्यानुसार पाच जणांच्या उपस्थितीत हे विसर्जन पार पडणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली.
गणेशोत्सवाबाबत भिवंडी पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी पार पडली. या वेळी महापौर पाटील आणि आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले. या बैठकीस पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडी शहरातील घरगुती गणेशमूर्तींची उंची दोन फुटांपर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फूट उंच मूर्तीची मर्यादा निश्चित केली आहे. तर गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांना काढता येणार नाही. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स आॅक्सिमीटरद्वारे तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाची नोंदही ठेवण्याची अट मंडळांना घातली असून, मास्क लावणे बंधनकारक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. भिवंडी महापालिकेने गणेशोत्सवासाठी तयार केलेल्या नियमावलीनुसार गणेश आगमन आणि विसर्जनावेळी पाच व्यक्तींनाच परवानगी दिली आहे. गणपतीची सजावट पर्यावरणपूरक आणि कमीतकमी असावी.
>निर्माल्य महापालिकेकडे द्या!
मोठ्या गृहसंकुलांतील गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याबरोबरच निर्माल्य स्वतंत्र जमा करून ते विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करावे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. शाडूच्या गणेशमूर्तीची पूजा करून तिचे घरीच बादलीमध्ये विसर्जन करावे. तर पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश दर्शनासाठी केबल नेटवर्क, आॅनलाइन सुविधा अथवा फेसबुक लाइव्हवरून व्यवस्था करावी. विसर्जनस्थळी नागरिकांना कमीतकमी वेळ थांबता यावे यासाठी भक्तांनी घरीच आरती करावी. तसेच, शक्यतो घराच्या आवारात, इमारतीच्या परिसरात विसर्जन करावे. विसर्जनासाठी येताना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.अन्नदान, महाप्रसादाच्या कार्यक्रमाला मनाई केली आहे. मंडपाची उंची १२ फुटांपेक्षा जास्त असू नये; तसेच आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश देणाºया जाहिराती प्रदर्शित कराव्यात, असे आयुक्त डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: The mobile app will be used to avoid crowds during immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.