मोबाइल जबरीने चोरणाऱ्यास ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:26 AM2020-10-23T00:26:34+5:302020-10-23T00:30:55+5:30
मोबाइल जबरदस्तीने खेचून पलायन करणा-या संजय गुरुनाथ जाधव (२६) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्या साथीदाराला मात्र २६ आॅक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन ठाणे न्यायालयने मंजूर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मोबाइल जबरदस्तीने खेचून पलायन करणाºया संजय गुरुनाथ जाधव (२६, रा. भिवंडी, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ५२ हजार ९०० रुपयांचे सहा मोबाइल हस्तगत केले असून त्याच्या साथीदाराला मात्र २६ आॅक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन ठाणे न्यायालयने मंजूर केला आहे.
माजीवडा भागातील रहिवाशी मणिलाल मुकूंद गडा हे १६ नोव्हेंबर २०१९ रोजी माजीवडा रिक्षा स्टॅन्डजवळ उभे असतांना त्यांच्या हातातील मोबाइल मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हिसकावून पलायन केले होते. याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तब्बल वर्षभर याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक संजय पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिताराम बुधर यांनी तपास केला. वर्षभराने म्हणजे १८ सप्टेंबर २०२० रोजी या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना स्ट्रेसआऊट झाले. त्याआधारे २० सप्टेंबर रोजी संजय जाधव याला भिवंडीतून या पथकाने अटक केली. त्याला २६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर १० आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याच्याकडून या ५५ हजार ९०० रुपयांच्या मोबाइलसह अन्य पाच असे एक लाख ५२ हजार ९०० रुपयांचे सहा मोबाइल हस्तगत करण्यात आले. या पाचमध्ये एक माजीवडा भागातून गहाळ झालेला मोबाइलही त्याच्याकडे मिळाला. चौकशीत मोहंमद राहील या त्याच्या साथीदाचे नावही उघड झाले. त्याला हे पथक ताब्यात घेण्यासाठी गेले तेंव्हा अटकपूर्व जामीनासाठी त्याने ठाणे न्यायालयात धाव घेतली. त्याला २० आॅक्टोबर २०२० रोजी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून त्याच्या जामीन अर्जावर २६ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून आणखीही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.