ठाणे कारागृहातील मोबाइल गूढ उकलणार, तपासात स्पष्ट होणार सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:18 AM2018-03-16T03:18:45+5:302018-03-16T03:18:45+5:30
मध्यवर्ती कारागृहात ३१ डिसेंबर रोजी चक्क मोबाइलवर बोलताना एक कैदी मिळून आला होता. त्याचा ताबा गुरुवारी ठाणेनगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार, तळोजा कारागृहातून घेतला.
ठाणे : येथील मध्यवर्ती कारागृहात ३१ डिसेंबर रोजी चक्क मोबाइलवर बोलताना एक कैदी मिळून आला होता. त्याचा ताबा गुरुवारी ठाणेनगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार, तळोजा कारागृहातून घेतला. त्यानंतर, रात्री त्याला अटक केली. त्यामुळे चौकशीत त्याच्याकडे सापडलेला मोबाइल कुठून आला, याचा उलगडा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रमेश प्रताप साळवे असे या आरोपीचे नाव आहे. तो मोक्कातील आरोपी आहे. त्याची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्यावर त्याला बरॅक क्र मांक-४ मध्ये ठेवले होते. ३१ डिसेंबरच्या पहाटे रमेश असलेल्या बरॅकमधून बोलण्याचा आवाज कारागृह कर्मचाऱ्यांचा कानांवर आला. त्यामुळे तेथे तपासणी करण्यात आली. त्यावेळी अंगावर चादर ओढून झोपण्याचे सोंग घेतलेला रमेश चक्क मोबाइलवर बोलत असल्याची बाब समोर आली. त्यावेळी, तातडीने त्याच्याकडील मोबाइल फोन जप्त करण्यात आला होता.
याप्रकरणी कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार रमेश याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचदरम्यान, रमेशला पुन्हा नवी मुंबई तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. त्याच्याकडे मोबाइल आला कसा, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच होता. कारागृहात आणताना कैद्यांची कसून झडती घेतली जाते. तरीही, ते कारागृहात मोबाइल आणून फोनवर बोलत असल्याची बाब या प्रकारानंतर समोर आल्याने कारागृहाची सुरक्षाव्यवस्था तितकी सक्षम नसल्याची बाब दिसून आली होती. ते गूढ आता तपासात उलगडेल.
>नव्याने केली अटक : या प्रकरणाच्या तपासासाठी त्याचा ताबा मिळावा, अशी मागणी ठाणे न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार, न्यायालयाच्या आदेशाने तळोजा कारागृहातून गुरुवारी रमेशचा ताबा ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांच्या पथकाने घेऊन त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली.