प्रतिबंधित क्षेत्रात फिरती विसर्जनव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:41 AM2020-08-18T00:41:52+5:302020-08-18T00:41:58+5:30
या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
ठाणे : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना गणेश विसर्जनासाठी बाहेर पडण्याची मुभा नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जनव्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या अभिनव संकल्पनेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रातील मूर्तींचे विसर्जन घरीच करण्याविषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी फिरती विसर्जनव्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ट्रॅक्टर अथवा जीपमागे सिंटेक्स टाकीत कृत्रिम विसर्जनव्यवस्था राहणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
>भाविकांना विसर्जनासाठीची आरती घरीच करावी लागणार असून फिरत्या विसर्जनव्यवस्थेंतर्गत कृत्रिम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधिवत विसर्जन करण्यात येते, त्याच पद्धतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.