गॅस सिलिंडरसह मोबाईल चोरी करणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:38 AM2021-08-29T04:38:01+5:302021-08-29T04:38:01+5:30

ठाणे : व्यावसायिक वापरासाठी असलेले गॅस सिलिंडरच्या बाटल्यांची चोरी करणाऱ्यास अटक केली आहे. तसेच दुसऱ्या घटनेत दुकान फोडून ...

Mobile thief arrested with gas cylinder | गॅस सिलिंडरसह मोबाईल चोरी करणारे अटकेत

गॅस सिलिंडरसह मोबाईल चोरी करणारे अटकेत

Next

ठाणे : व्यावसायिक वापरासाठी असलेले गॅस सिलिंडरच्या बाटल्यांची चोरी करणाऱ्यास अटक केली आहे. तसेच दुसऱ्या घटनेत दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या चोरांना अटक करून आरोपींकडून सिलिंडर आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. गॅस सिलिंडर चोरीच्या गुन्ह्याची पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत उकल केली आहे.

कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर येथील एका सोसायटीच्या बाजूला रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन चाकी टेम्पोमधून भरलेले १९ किलोच्या तीन आणि नऊ रिकाम्या अशा १२ गॅस सिलिंडरच्या बाटल्यांची चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या चोरीप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे यांच्या पथकाने सतीश राक्षसकर या युवकाला अटक केली आहे. सतीश मूळचा अमरावतीचा असून, तो घोडबंदर भागातील साईनाथनगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून चोरीचे सिलिंडर जप्त केले आहेत.

तर दुसऱ्या एका घटनेत आनंदनगरमध्येच असलेले एक दुकान फोडून चोरांनी दुकानातून वेगवेगळ्या कंपनीचे २२ मोबाईल आणि अन्य वस्तू असा एकूण एक लाख ५२ हजार ८७७ रुपयांचा ऐवज चोरला होता. दुकानाचे मालक शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर चोरांविरुद्ध २० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी रुपेश राजपूत आणि योगेश मलिंगे या दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून ५७ हजार ५१८ रुपयांचे नऊ नवीन मोबाईल जप्त केले आहेत. या आरोपींविरुद्ध यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Mobile thief arrested with gas cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.