टीएमटीच्या प्रवासात महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोबाइल चोरट्यास रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:34 AM2020-09-25T00:34:08+5:302020-09-25T00:38:40+5:30
ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमध्ये मोबाइलची चोरी करणाऱ्या उमरअली शहा (४६, रा. कुर्ला, मुंबई) याला महिलेच्या प्रसंगावधानामुळे नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बसमध्ये चालक आणि वाहक यांनी बसचे दरवाजे बंद करुन महिलेला मदत केल्यामुळे तिचा मोबाइलही परत मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तीन हात नाका ते पातलीपाडा या मार्गावरुन जाणाºया ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमध्ये मोबाइलची चोरी करणाºया उमरअली शहा (४६, रा. कुर्ला, मुंबई) याला महिलेच्या प्रसंगावधानामुळे नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलही हस्तगत करण्यात आला आहे.
मानपाडयातील आझादनगर येथे राहणारी ही २९ वर्षीय महिला २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान टीएमटीच्या बस क्रमांक ५६ मधून प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्या हातातील मोबाइल चोरीस गेल्याचे बसमध्ये बसल्यानंतर तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा केल्यानंतर बसचे चालक आणि वाहक यांनी बसची दोन्ही दरवाजे लावले. त्यावेळी प्रत्येक प्रवाशाकडे केलेल्या चौकशीमध्ये उमरअली याच्या पॅन्टच्या खिशात हा मोबाइल मिळाला. त्याला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी त्याला अटक केली आहे.