मोबाइल टॉवरचा महापालिका करणार सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:08 AM2018-12-21T05:08:30+5:302018-12-21T05:08:46+5:30
सदस्यांची महासभेत मागणी : प्रशासनाने घेतला निर्णय
ठाणे : शहरात कोणकोणत्या ठिकाणी मोबाइल टॉवर आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने गुरुवारी घेतला. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटलपासून ते किती अंतरावर आहेत, याची माहिती यातून समजणार आहे. ते नियमाप्रमाणे आहेत की नाहीत, याची तपासणीदेखील केली जाणार असून यासंदर्भातील अहवाल सादर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी सभागृहात केली.
ठाण्याच्या विविध भागांत एक हजार टॉवर उभे आहेत. परंतु, ठाणे महापालिकेकडे ते कोणत्या ठिकाणी बसवले आहेत याची आणि त्यापैकी प्रत्येक टॉवरमधून किती प्रमाणात रेडिएशन बाहेर पडते, याची माहिती नाही. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित झाला होता. मायक्र ो सेल टॉवर विद्युतपोलवर बसवण्याच्या प्रस्तावावरून सभागृहात असलेल्या या टॉवरविषयी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सखोल चर्चा करण्यात आली. टॉवर कोणत्या ठिकाणी उभारावे, याचे निश्चित धोरण महापालिकेकडे नसल्यानेच नको त्या ठिकाणी ते उभारल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी सभागृहात उघड केली. दिवा भागातील नगरसेवक बालाजी पाटील यांनी दिवा येथील अर्धवट असलेल्या रस्त्यावर मोबाइल टॉवर उभारला असून तो काढण्याचे साधे कष्टदेखील प्रशासनाने घेतले नसल्याचे सभागृहात सांगितले.
काही मोबाइल टॉवर तर डीपी रस्त्यामध्ये तसेच शैक्षणिक संस्थांजवळ बसवल्याचा मुद्दादेखील यावेळी उपस्थित करण्यात आला. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिकादेखील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. मुंब्रा परिसरात उभारलेले टॉवर हे एक तर अनधिकृत इमारतींवर किंवा धोकादायक इमारतींवर उभारले असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा मुद्दा नगरसेविका अशरीन राऊत यांनी उपस्थित केला. मात्र, यावरदेखील प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही.
सर्व्हे योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता
विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शहरात असलेल्या मोबाइल टॉवरचा योग्य पद्धतीने सर्व्हे करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शहरात आणखी नवीन टॉवर येण्याआधी तो होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या चर्चेनंतर शहरातील सर्व टॉवरचा लवकरच सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.