मोबाइल टॉवरचे होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:37 PM2019-01-27T23:37:31+5:302019-01-27T23:37:45+5:30
शहरातील मोबाइल टॉवरचे सर्वेक्षण खाजगी कंत्राटदाराकडून होणार असल्याचे महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले.
उल्हासनगर : शहरातील मोबाइल टॉवरचे सर्वेक्षण खाजगी कंत्राटदाराकडून होणार असल्याचे महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले. टॉवरपासून १० ते १५ कोटीचे कर स्वरूपात उत्पन्न मिळण्याची प्रतिक्रीया दिली. एका महिन्यात २० पेक्षा जास्त मोबाइल टॉवरना मंजुरी दिल्याचे उघड झाले.
उल्हासनगरमध्ये विनापरवाना मोबाइल टॉवर उभे राहिल्याने, बहुतांश टावरची नोंद पालिका दफ्तरी नाही. मागील आठवडयात नागरिकांचा विरोध डावलून खेमानी परिसरात मोबाइल टॉवरचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांनी पालिकेवर धडक देत नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांना जाब विचारला होता. त्यावेळी सोनावणी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांनी दिलेली मोबाइल टॉवरची परवानगी फेटाळत काम बंद केले.
ज्या इमारतीवर टॉवर उभारण्यात आले ते नियमबाह्य असल्याची माहिती समाजसेवक सुरेश सोनावणे यांनी दिली. बहुतांश टॉवरनी इमारतीमधील नागरिकांसह परिसरातील नागरिकांची ना हरकत परवानगी घेतली नाही. तसेच नियमानुसार कोणत्याच अटी-शर्तीचे पालन केले नसल्याची माहिती दिली. खेमानी परिसरातील मोबाइल टॉवरचा प्रकार उघड झाल्यावर, आयुक्त हांगे यांनी शहरातील सर्वच मोबाइल टॉवरचे सर्वेक्षण खाजगी कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला.
कागदपत्रांची पूर्तता
सर्वेक्षणात किती टॉवर बेकायदा व वैध आहेत हा सर्व प्रकार उघड होणार आहे. आयुक्तांच्या निर्णयाने कागदपत्र पूर्ण करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. मोबाइल टॉवरप्रमाणे भाडयाच्या इमारतीत व जागेत असलेले विविध बँक, एटीएमला किती मालमत्ता कर आकारण्यात आली याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.