ठाण्यात मोबाइल चोरटयास अटक: नौपाडा पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:45 PM2019-08-18T22:45:27+5:302019-08-18T22:50:02+5:30
नौपाडयातील एका घरातून मोबाइल चोरी करणारा परमेश जैस्वाल हा बाजूच्याच घराच्या भिंतीवरुन उडी मारतांना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हाच धागा मिळाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने त्याला अटक केली.
ठाणे: नौपाडयातील बी केबिन परिसरातून मोबाइल चोरणाऱ्या परमेश भिशीनाथ जैस्वाल (३०, रा. साठेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चार मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
नौपाडयातील खैरुन्निसा अगवान (५०) या महिलेच्या घरातून तसेच अशोक शेळकेन्यू (४९) यांच्या घरातून अज्ञात चोरटयाने मोबाइल लंपास केल्याची घटना १६ आॅगस्ट २०१९ रोजी घडली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. नौपाडयातील एका घरातून मोबाइल चोरी करणारा परमेश हा बाजूच्याच घराच्या भिंतीवरुन उडी मारतांना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हाच धागा मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, हवालदार सुनिल अहिरे, पोलीस नाईक गोरख राठोड आदींच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे परमेश याला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याने आणखीही मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१८ मध्ये तो चोरीच्या गुन्हयात कारागृहातून सुटला होता. त्यानंतर पुन्हा तो चोरी करतांना पकडला गेल्याचे तपासातून उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.