‘मोडकसागर’ ९४ टक्के भरले, पाणीटंचाईचे संकट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:51 AM2020-08-18T00:51:26+5:302020-08-18T00:51:31+5:30
आंध्रा व मध्य वैतरणा धरणात सर्वाधिक पाऊस पडला. मोडक सागर धरण ९४ टक्के, तर बारवी ७३ टक्के भरले आहे.
ठाणे : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात सरासरी जेमतेम १६.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. आंध्रा व मध्य वैतरणा धरणात सर्वाधिक पाऊस पडला. मोडक सागर धरण ९४ टक्के, तर बारवी ७३ टक्के भरले आहे.
सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन पाणीकपात लागू करण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढला आहे. साहजिकच पाणीकपातीची चिंता आता दूर झाली आहे.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणारे बारवी, आंध्रा, मोडकसागर धरण १०० टक्के भरले होते. पण आता बारवीत ७२.८३ टक्के पाणी साठा झाला आहे. आज बारवी धरणाच्या परिसरात केवळ १० मि.मी. पाऊस पडला. मात्र, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. यामध्ये खानिवरे ६० मि.मी., कान्होळ २७ मि.मी., पाटगाव आणि ठाकूरवाडीला आठ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट टळले आहे.
बारवीची पाणीपातळी ६९.१९ मीटर झाली असून हे धरण भरुन वाहण्याकरिता धरणात अजून ३.४१ मीटर पाणीसाठा आवश्यक आहे. भातसा धरणात ८२.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी धरणात २४ मि.मी. पाऊस पडला तर आंध्रा धरणात आज ५३ मि.मी. पाऊस झाला. आता या धरणात ५४.४२ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ३५ मि.मी. पाऊस पडला. या धरणात ९४ टक्के साठा आहे. तानसात १६ मि.मी. पाऊस आज झाला असून ८२ टक्के साठा तयार झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी १६ मि.मी. पाऊस पडला. यापैकी ठाणे शहरात १६ मि.मी., कल्याण १७ मि.मी., मुरबाड १४ मि.मी., भिवंडी २० मि.मी., शहापूरला १९ मि.मी., उल्हासनगर ११ मि.मी. आणि अंबरनाथ १० मि.मी. पाऊस पडला आहे.