मोदी जीवावर उदार होऊन पाकला गेले
By admin | Published: December 28, 2015 02:36 AM2015-12-28T02:36:29+5:302015-12-28T02:36:29+5:30
मराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल
मुरलीधर भवार, कल्याण
मराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीवरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेत त्यांच्या मदतीला सरसावले. मोदी हे जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले ते पाहा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला.
मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अचानक पाकिस्तानला भेट दिली. ही भेट पूर्वनियोजित होती किंवा कसे, यावरून तसेच ही भेट एका उद्योगपतीच्या विनंतीवरून घेतली गेली किंवा कसे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना सबनीस यांनी या वादात उडी घेतली आहे.
सबनीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाक संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानला दिलेल्या भेटीकडे कलुषित नजरेने पाहणे अयोग्य आहे. मोदी जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले. त्या ठिकाणी त्यांच्या जीवास घातपातही होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोदींची ही भेट विवेकी राष्ट्रवादीचे लक्षण आहे.
कल्याण सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या पु.भा. भावे व्याख्यानमालेनिमित्त अध्यक्ष सबनीस कल्याण वाचनालयात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आधीच्या सरकारमधील सिंचन घोटाळा व विद्यमान सरकारमधील चिक्की घोटाळा हे आर्थिक भ्रष्टतेचे भाग असून, जोपर्यंत हे घोटाळे थांबत नाहीत, तोपर्यंत विस्कटलेला सांस्कृतिक नकाशा नीट होणार नाही, अशा शब्दांत सबनीस यांनी सत्ताधारी व विरोधकांना टोले लगावले. देशात असहिष्णुता निर्माण झालेली आहे, याबद्दल वादच नाही. ती मी मान्य करतो. असहिष्णुता धार्मिक स्वरूपाची आहे. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यादेखील निंदनीय आणि निषेधार्ह आहेत. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्याकरिता काही समाज, गट गोडसे यांचे मंदिर उभारणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. हा भ्रष्ट वैचारिकतेचा दाखला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला गोडसे ब्राह्मण होते म्हणून त्या जातीला दोषी व गुन्हेगार ठरविणे, हेदेखील न्यायाला धरून नाही.