मोदीजी, कल्याण-डोंबिवलीकरांना गृहीत धरू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 05:11 AM2018-12-17T05:11:10+5:302018-12-17T05:11:34+5:30
निवडणुकीच्या तोंडावर नेते, कार्यकर्त्यांची फाटाफूट होऊ नये, कल्याण हा बालेकिल्लाच रहावा यासाठी मोदींची सभा येथे घेण्याचे ठरले आहे.
अनिकेत घमंडी, डोंबिवली
देशातील लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये म्हणजेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची हार झाली. शहरी व ग्रामीण या दोन्ही मतदारांमध्ये केंद्र व राज्यातील भाजपा सरकारबद्दल नाराजी आहे, याची जाणीव पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला झाली आहे. एकीकडे विकासाचे गाजर दाखवले म्हणून मोठा शहरी, मध्यमवर्गीय मतदार नाराज तर दुसरीकडे राम मंदिराचा मुद्दा बहुमत असूनही पूर्णपणे तडीस नेला नाही म्हणून रा. स्व. संघाच्या परिवारातील संघटना, साधू-संताचा कोप अशा कात्रीत सध्या भाजपा सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येत आहेत. येणारा काळ हा राजकीय घडामोडींचा व तीव्र चुरशीचा असणार आहे.
विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपाला मित्रपक्ष शिवसेनेसोबत संघर्ष करावा लागणार आहे. विकास कामांचे श्रेय घेण्यावरुन रस्सीखेच करावी लागणार आहे. त्याची चुणूक या दौऱ्याच्या निमित्ताने दिसली. भाजपाला आपली शक्ती टिकवून वाढायचे असेल तर शिवसेनेचे शक्तीस्थळ असलेल्या ठाणे जिल्ह्यावर चढाई करणे भाजपाला अपरिहार्य असून मोदींचा दौरा ही त्याच चढाईची व भविष्यात होणाºया तुंबळ संघर्षाची नांदी आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नेते, कार्यकर्त्यांची फाटाफूट होऊ नये, कल्याण हा बालेकिल्लाच रहावा यासाठी मोदींची सभा येथे घेण्याचे ठरले आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील तसेच आ. किसन कथोरे या भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी धरलेला हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला. कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरे शेकडो नागरी समस्यांची आगार आहेत. वर्षानुवर्षे येथे शिवसेना, भाजपाची खालपासून वरपर्यंत सत्ता आहे. मात्र अनेक मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. नेहमीच भाजपा-शिवसेनेची पाठराखण करणाºया मतदारांचा गेल्या चार ते साडेचार वर्षांत अक्षरश: भ्रमनिरास झाला आहे. येथील पारंपारिक मतदार सुखसुविधांपासून वंचित आहे. पंतप्रधानांच्या दौºयानिमित्त या दोन्ही शहरांची रंगसफेदी करण्यात शासकीय यंत्रणा मग्न आहेत. त्यामुळे कायम आपल्याला साथ देणारी शहरे व्हेंटीलेटरवर आहेत हे पंतप्रधानांच्या लक्षातच येणार नाही, असा बंदोबस्त केला जाणार आहे.
त्यामुळे मोदी येऊन गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल, कार्यकर्ते कामाला लागतील. पण समस्याग्रस्त मतदारांचे काय? त्यांच्या समस्या ‘जैसे थे’च राहणार असतील तर त्यांचा वाली कोण? डोंबिवली, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी या सर्व ठिकाणच्या मतदारांना सुखसुविधा आहेत असा एकही मतदारसंघ गेल्या साडेचार वर्षात केंद्र किंवा राज्य सरकारला चार वर्षात का निर्माण करता आला नाही. स्मार्ट सिटीच्या केवळ पोकळ वल्गना ठरल्या. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये करोडोंचा निधी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राने पाठवला. मात्र तो महापालिका प्रशासनाने फ्रिजींग (सुरक्षित)करून ठेवला आहे. तो तात्काळ का वापरला जात नाही. कुरघोडीच्या अंतर्गत राजकारणामुळे निधी अडकल्याचे दबक्या आवाजात अधिकारी सांगतात. येथील लोकांच्या तोंडावर आश्वासनांचे जाळे फेकताना मोदी यांना यापूर्वीच्या आपल्याच आश्वासनांची कदाचित कल्पनाही नसेल. मोदी येणार म्हणून सध्या रस्त्यांना मुलामा देऊन चकाकी आणली जात असली तरी ती किती काळ टिकणार? कारण या दोन्ही शहरातील प्रवासी दररोज वर्षभर खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करतात. मोदींचे हेलीकॉप्टर उतरवण्यासाठी अतिक्रणांपासून मुक्त, मोकळी, सुसज्ज जागा या दोन्ही शहरात राखू शकलो नाही, या कल्पनेनी स्थानिक नेत्यांची मान लाजेने खाली जायला हवी. शहरात सर्वत्र अतिक्रमणे असल्याने राज्यमंत्र्यांची हेलिपॅडच्या जागेसाठी धावपळ झाली. टोलेजंग अनधिकृत इमारतींच्या जाळयामुळे आणि आरक्षित भूखंड अतिक्रमणांनी वेढले असल्याने ही नामुष्की ओढवली आहे. पंतप्रधानांना या साºयाची गंधवार्ता आहे की, सर्व काही आलबेल असल्याचे त्यांना भासवण्यात आले आहे ते तेच जाणो. मोदींना डोंबिवलीमधून कल्याणला रस्ते मार्गाने नेले असते तर पत्रीपुलाची सहनशक्तीचा अंत पाहणारी कोंडी, अरूंद रस्ते, २७ गावांमधील अनास्था, कल्याण शिळ रोडचे (अ)रुंदीकरण, एमआयडीसीमधील प्रदूषण, प्रचंड धूळ, आरोग्याची अनास्था, गोळवली परिसरातील झोपडपट्टीची समस्या याचा किमान ट्रेलर तरी मोदींना पाहता आला असता.
भाजपाचे राज्यमंत्री, आमदार, खासदार प्रचंड ‘कार्यकुशल’ असले तरीही सर्वसामान्यांना सेवा पुरवण्यात ते कमी पडत असल्याचे तो ट्रेलर पाहताच मोदींच्या झटक्यात निदर्शनास आले असते. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेली २२ वर्षे युतीची सत्ता आहे. मात्र पिण्याचे पुरेसे पाणी, चांगले रस्ते, उत्तम शासकीय इस्पितळे, घनकचरा व्यवस्थापनाचा चोख बंदोबस्त यापैकी काही येथील लोकांच्या पदरात पडलेले नाही. याचा अर्थ सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून काही कामच झालेले नाही, असे नाही. काही कामे नक्की झाली आहेत. मात्र राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीची आणि नवी मुंबई किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असल्यावर तेथे जसा कायापालट होतो तसा तो कल्याण-डोंबिवलीत झालेला नाही. अनेक समस्यांची २० वर्षांपूर्वी चर्चा सुरु होती व आजही सुरु आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गंगा स्वच्छ करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. त्याकरिता अब्जावधी रुपयांची तरतूद केली आहे. पण भाजपाचे इथले नेते महापालिकेला लाभलेला सुमारे १८ किमीच्या खाडीकिनाºयाची प्रदूषणामुळे गटारगंगा झाली असूनही स्वच्छ का करू शकत नाहीत? गंगाघाटावर आरती करण्यासाठी लाखो हिंदू जमा होतात, पण या ठिकाणच्या खाडी किनाºयांवरील गणेशघाटावर बुद्धीची देवता गणपतीच्या मूर्तीला अनंत चर्तुदशीला आणि नवरात्रानंतर देवीच्या विसर्जनाकरिताही लाखो भक्त जमतात. छातीवर दगड ठेवून गटारगंगेत आपल्या दैवतांचे विसर्जन करतात.
एलफिस्टन रेल्वे स्थानकात गतवर्षीच्या दुर्घटनेनंतर लष्कराला पाचारण करुन केवळ तीन महिन्यात एलफिस्टन व आंबिवली येथील रेल्वे पूल उभारण्यात आले. मात्र केवळ दुर्घटना न घडल्याने लाखो कल्याण डोंबिवलीकर त्यांचे रोजचे मौल्यवान तास, लाखो लीटर इंधन वाया जात असूनही ऐतिहासीक १०४ वर्षांचा पत्रीपूल पाडल्यानंतर त्या जागी दुसरा नवा पूल बनवण्यासाठी दोन वर्षे लागणार असतील तर ‘मेक इन इंडिया’चा तो अद्ययावत तंत्रज्ञानाने विकसीत केलेला सिंह गेला कुठे?
राजकारणातील काँग्रेसच्या घराणेशाहीवर मोदींपासून सारेच भाजपा नेते तोंडसूख घेतात. मात्र कल्याण-डोंबिवली ही अशी दोन शहरे आहेत की, तेथे मतदारांची वर्षानुवर्षे युतीला मते देण्याची ‘घराणेशाही’ सुरु आहे. नातवंडे, पतवंडे हेही डोळे झाकून भाजपा, सेनेला मते टाकतात. अनेक गोष्टींचा स्पर्श या शहरांना होणार नसेल तर ही मतांची घराणेशाही येथील मतदारांनी का जपावी?
पंतप्रधान येथे येऊन काय बोलतात? निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पण वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या पॅकेजबद्दल काय घोषणा होते, याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र तिकडे युतीच्या सर्व नेत्यांना पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर बसायला मिळणार की नाही, यावरुन सुरु असलेल्या धुसफुशीत युतीचे नेते दीर्घकाळ रमले होते. मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना गृहीत धरु नये. ताज्या विधानसभा निकालांतून वेळीच धडा घ्यावा हे उत्तम.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शासकीय कार्यक्रमानिमित्त कल्याण-डोंबिवलीस भेट देत आहेत. मोदी येणार म्हणून दोन्ही शहरांत वरवरची रंगसफेदी सुरु आहे. प्रत्यक्षात ही दोन्ही शहरे शेकडो नागरी समस्यांची आगार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला धडा शिकवला आहे. मोदी यांनी कल्याण-डोंबिवलीकरांनाही गृहीत धरु नये, हेच खरे.