मोदींची वाटचाल वाजपेयी यांच्या मार्गावरुन - मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 02:40 AM2018-12-22T02:40:38+5:302018-12-22T02:41:11+5:30
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त मीरा रोड येथे आयोजित अटलकुंभमध्ये वाजपेयींचे उत्तराधिकारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर गुरुवारी रात्री मंथन झाले.
मीरा रोड : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त मीरा रोड येथे आयोजित अटलकुंभमध्ये वाजपेयींचे उत्तराधिकारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर गुरुवारी रात्री मंथन झाले. अटलजी ज्या मार्गावर देशाला घेऊन जाऊ इच्छित होते, त्याच मार्गावर नरेंद्र मोदी आज देशाला घेऊन जात आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलजींचे उत्तराधिकारी म्हणून मोदींचे नाव पुढे केले. तोच धागा धरून बिहारचे राज्यपाल लालजी टंडन म्हणाले की, अटलजींनी जो विकासाचा पाया रचला होता, त्याला शिखरापर्यंत नेण्याचे काम त्यांचे उत्तराधिकारी मोदी करत आहेत.
मीरा रोड येथे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात वाजपेयींच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अटलकुंभ या वाजपेयींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम दीपकमल फाउंडेशनने आयोजित केला होता. बिहारचे मंत्री नंदकिशोर यादव, जिल्हाध्यक्ष राजेश नार्वेकर, स्वागताध्यक्ष आ. मेहता, महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, गटनेते हसमुख गेहलोत आदी यावेळी उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष अमरजित मिश्रा यांनी प्रास्ताविक केले.
अटलजींचे सहकारी शिवकुमार व राजस्थानचे माजी मंत्री गुलाबचंद कटारिया यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अभिनेता शेखर सुमन, रवी किशन, अभिनेत्री पूनम ढिल्लो, हिमानी शिवपुरी, कवी महेश दुबे, गायक विनोद दुबे, सुरेश शुक्ला यांनी अटलजींच्या कवितांचे वाचन आणि गायन करून त्यांच्या विचारांना उजाळा दिला. अटलजींच्या जीवनावर आधारित शब्दों के शिल्पी अटल, ही चित्रफीत सादर करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींनी देशात नवीन कार्यसंस्कृतीची निर्मिती केली आहे. त्या कार्यसंस्कृतीचा पाया अटलजींनी रचला होता. जोपर्यंत देश विश्वगुरूच्या पदावर पुन्हा पोहोचत नाही, तोपर्यंत शांत आणि स्वस्थ न बसण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. देशाला पुन्हा विश्वगुरू बनवणे, हीच वाजपेयींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
समुद्रमंथनात देवांना अमृत मिळाले, तेव्हा दानवांपासून वाचवण्यासाठी ते घेऊन जात असताना जिथे अमृताचे थेंब पडले, तिथे कुंभाचे आयोजन होते. त्याच प्रकारे अटलजींचे अमृतमयी विचार जिथे पोहोचतात, तिथे आपोआपच कुंभ तयार होते. अटलजींनी त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजासाठी दिला. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्तासुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन जीवनात पुढे जाऊ शकतो. अटलजी ऊर्जा देण्याचे काम करायचे. निराशेच्या क्षणात त्यांच्याकडून बळ मिळायचे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अटलजींच्या काही काव्यपंक्ती सादर केल्या.
मेट्रोची प्रतिकृती
मीरा-भार्इंदर मेट्रोचे भूमिपूजन झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आ. मेहता व महापौरांना मेट्रोची प्रतिकृती भेट देण्यात आली. काही वर्षांपूर्वीही अशीच मेट्रो मुख्यमंत्र्यांना मेहतांनी भेट दिली होती.
नागरिकांचा काढता पाय
कार्यक्रमाला मूळात मुख्यमंत्री उशिराने आले. अभिनेते शेखर सुमन यांचे भाषण लांबल्याने कंटाळून उपस्थित नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. व्यासपीठावर बिहारी नेत्यांचीच अधिक उपस्थिती होती.