मेळघाटातील राख्या मोदींच्या हातावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:45 AM2018-08-25T00:45:05+5:302018-08-25T07:07:48+5:30
रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत.
- जान्हवी मोर्ये
कल्याण : मेळघाटामधील धारणी तालुक्यातील लवादा येथील आदिवासी बांबू केंद्राच्या मदतीने पर्यावरणपूरक राख्या तयार करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत. मोदी यांनी या केंद्रातील कार्यकर्त्यांना राखी बांधण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
मेळघाट हा प्रदेश कुपोषित आहे. बांबू तेथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. स्थानिक आदिवासींनी बांबूपासून निरनिराळ्या वस्तू बनवून आपली हजारो वर्षांपासूनची कला जोपासली आहे. बांबू व वनस्पतीच्या बियांपासून त्यांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक राख्यांना महाराष्ट्रात आणि देशाबाहेरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आदिवासींना रोजगाराची संधी मिळाली आहे. मोदी यांनी या कलेची दखल घेत बांबू केंद्राच्या कार्यकर्त्यांना रविवारी राख्या बांधण्यासाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी दिली आहे.
बांबू केंद्राचे प्रमुख सुनील देशपांडे म्हणाले की, केंद्राच्या चार आदिवासी महिलाही राखी बांधण्यासाठी नवी दिल्ली येथे जाणार आहेत. केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर क्लचरल रिलेशन्सच्या वतीने मेळघाटातील आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या या राख्या जगभरातील ४० देशांमध्ये जाणार आहेत. याशिवाय, या पर्यावरणपूरक राख्या विद्यार्थ्यांना तयार करता याव्यात, यासाठी ६० हजार राख्या बनवण्याचे संच तयार करण्यात आले आहेत. राज्यातील ५०० शाळांतील विद्यार्थ्यांना ते देण्यात आले आहेत.