भिवंडीतील आदिवासींवर अत्याचार करणारे आरोपी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:25+5:302021-09-23T04:46:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पिळंझे गावातील कथित सावकार राजाराम पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यावर आदिवासी बांधवांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पिळंझे गावातील कथित सावकार राजाराम पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यावर आदिवासी बांधवांची छळवणूक, वेठबिगारी, बलात्कार, पॉक्सो तसेच अनुसूचित जाती, जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये मागील महिन्यात गुन्हे दाखल होऊनही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही.
मागील महिन्यात गणेशपुरी पोलीस ठाण्यात पाटील बंधूंवर गुन्हे दाखल झाले. एक महिना उलटला तरी आरोपींना गणेशपुरी पोलिसांनी अटक केली नसल्याबद्दल श्रमजीवी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची श्रमजीवी संघटनेची माहिती आहे. ३० वर्षांपासून सावकारांचा अत्याचार सहन केल्यानंतर पिळंझे येथील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा अत्याचाराला वाचा फोडली. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. गुन्हा दाखल होऊन महिना होत आला तरी आरोपींना पकडण्यात न आल्याने आदिवासी बांधव प्रचंड भीती व दडपणाखाली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
.....
मागील महिनाभरापासून श्रमजीवी संघटना या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करीत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोपींना तत्काळ अटक झाली नाही, तर श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करील.
- बाळाराम भोईर, सरचिटणीस, श्रमजीवी संघटना
.........
वाचली.