मोकाट गुरे, बेकायदा गोठ्यांना संरक्षण; महापालिकेकडे कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:53 AM2020-01-14T00:53:58+5:302020-01-14T00:54:10+5:30
डुकरांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने मोकाट गुरांसह डुक्कर आदींवर कारवाईसाठी ठेका दिला आहे. प्रत्यक्षात मात्र ठेकेदार कारवाईच करत नाही. पालिकेचे अधिकारी व नगरसेवकही त्यावर मूग गिळून गप्प बसत आहेत. दुसरीकडे रस्ते, खाजगी, कांदळवन, सीआरझेडच्या जागेत सर्रास बेकायदा गोठे थाटण्यात आले आहेत. महापालिका आणि नगरसेवकांकडून त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये रस्त्यांवर खुलेआम फिरणारी मोकाट गुरे नागरिक, वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दिवसरात्र रस्त्यांवर हिंडत असणाऱ्या गुरांमुळे वाहतूककोंडीही होत आहे. या समस्येत डुकरांचीही भर पडत आहे. डुकर पाळणाऱ्यांची संख्या वाढली असून सरकारी-खाजगी जागांसह कांदळवन भागात ही डकरे हैदोस घालत आहेत. त्यांच्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या रस्ते-पदपथावरही बेकायदा गोठे थाटले आहेत. तेथेच गवतविक्रीचा धंदाही केला जात आहे. गवत, शेण व मूत्राने दुर्गंधी पसरत असून गटारेही तुंबत आहेत.
महापालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, पशुविभागाचे डॉ. विक्रम निराटले यांच्यासह संबंधित ठेकेदार यांच्याकडून शहरातील मोकाट जनावरे, तबेले यांच्यावर ठोस कारवाईऐवजी जबाबदारी झटकण्याचे काम सुरू आहे. अनेक नगरसेवकांचेही यात हितसंबंध गुंतल्याने तेही याबाबत ब्र काढत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. नगरसेवकांचे यात हितसंबंध नाहीत. माझ्या प्रभागातील रस्ता-पदपथावर असलेल्या गोठ्यांविरोधात तक्रारी केलेल्या आहेत, असे नगरसेवक पंकज पांडे यांनी सांगितले. आपण पुन्हा याचा पाठपुरावा करून कारवाई करायला पालिकेस सांगितले आहे. पालिका कारवाई त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले.
गोठ्यांवर कारवाई सुरू
महापालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे म्हणाले की, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. डुकरांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. मोकाट गुरे, रस्ते-पदपथावरील व्यवसाय-गोठे व शहरातील कांदळवन, सीआरझेड, नाविकास क्षेत्र तसेच अन्य खाजगी-सरकारी जागेतील बेकायदा गोठ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देऊन कारवाईचा आढावा घेण्यात येईल, असे सांगितले.