हप्त्यांमुळे मुजोर फेरीवाले मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:24+5:302021-09-02T05:26:24+5:30
ठाणे : मुजोर फेरीवाल्याने कार्यक्षम महिला अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला संतापजनक व दुर्दैवी असून, त्याला कठोर शासन झाले पाहिजे, ...
ठाणे : मुजोर फेरीवाल्याने कार्यक्षम महिला अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला संतापजनक व दुर्दैवी असून, त्याला कठोर शासन झाले पाहिजे, हा हल्ला जीवघेणा असल्याने तपासात कोणतीही कसूर न ठेवता शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी केली. तर हप्त्यांमुळेच मुजोर फेरीवाले मोकाट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हप्त्यांमुळे करोडो रुपयांची उलाढाल होत असून, अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी, मुजोरी वाढली असून, यांचे गॉडफादर कोण आहेत? त्यांना कोण संरक्षण देतो? हे शोधून त्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजेत. अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाले यांना संरक्षण देणाऱ्यांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. फेरीवाला धोरण न्यायालयाचा आदेश असूनसुद्धा कागदावरच आहे. काही लोक स्वार्थापोटी याची अंमलबजावणी करायला टाळाटाळ करत असून, पालिकेतील सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे अनेक धोरणात्मक जनहिताच्या बाबी प्रलंबित असल्याचा दावाही त्यांनी केला.
फेरीवाला टोळीचाच बंदोबस्त करण्याची वेळ
कल्पिता पिंगळे यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असल्याचे मत भाजपच्या ठाणे शहर अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केले आहे; परंतु या फेरीवाल्यांना पाठबळ देणाऱ्या या फेरीवाला टोळींचाच बिमोड करण्याची आता वेळ असून, त्यावर कारवाईची मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.