मद्य वाहतुकीत तिसऱ्यांदा आढळल्यास ‘मोक्का’; राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठवला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:07 AM2022-11-01T07:07:39+5:302022-11-01T07:09:20+5:30
शेवटी पैसा जनतेचा आहे. कोविडच्या काळात लोकांच्या गरजेसाठी, आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.
ठाणे : एखाद्या राज्यातून महाराष्ट्रात मद्याच्या मोजक्या बाटल्या आणण्यासाठी परवानगी आहे; परंतु काही लोक टेम्पो भरून मद्याच्या बाटल्या आणतात. एकच व्यक्ती असा गुन्हा करताना तिसऱ्यांदा आढळली, तर त्याच्यावर ‘मोक्का’खाली कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्तींचा आम्ही शोध घेत आहोत. अशी व्यक्ती आढळल्यास मोक्काखाली कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिले असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सोमवारी दिली.
राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये जिजाऊ सामाजिक संस्थेच्यावतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी यांच्यासाठी ‘कृतज्ञतेची भाऊबीज’ हा उपक्रम आयोजित केला होता. त्यासाठी देसाई ठाण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोना काळात मुंबई महापालिकेने वापरलेल्या निधीची कॅगद्वारे चौकशी करणार असल्याबाबत विचारले असता, देसाई म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले असतील तर त्या पद्धतीने चौकशी केली जाईल.
शेवटी पैसा जनतेचा आहे. कोविडच्या काळात लोकांच्या गरजेसाठी, आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. जर यात काही गैरव्यवहार आढळून आला तर चौकशी केली जाईल. मविआच्या नेत्यांची सुरक्षा काढण्याविषयी ते म्हणाले की, ज्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे, त्यांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस विभागाकडे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती आहे. ती आढावा घेत असते.
दिरंगाईला कंटाळून उद्योग गेले बाहेर
सुरक्षेसाठी शिवसैनिकांचे कवच असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितल्याकडे लक्ष वेधले असता, देसाई यांनी राऊत यांच्या भूमिकेचे स्वागत केले. महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला जात असल्याबाबत ते म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर तीन महिन्यांत आम्ही उद्योगांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे एकही उद्योग बाहेर गेलेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगांबरोबर कुणीही चर्चा केली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झालेली नाही. या दिरंगाईला कंटाळून उद्योग बाहेर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योगांपेक्षा मोठे उद्योग आणण्याबाबत केंद्राशी चर्चा करत असल्याचे देसाई म्हणाले.